रानडुकराची शिकार करून मांस वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक; वन विभागाची वडगाव येथे कारवाई

0
3

वडगाव, दि. २८ (पीसीबी) : रानडुकराची शिकार करून मांस वाहतूक करणाऱ्या पाच जणांना वन विभागाने अटक केली. रानडुकराचे मांस आणि कार असा सहा लाखांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई वडगाव मावळ वनविभागाने गुरुवारी (दि. 26) वडगाव येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर केली.

मारुती शितोळे, सत्यवान भोईर, दत्ता वाघमारे, संजय वाघमारे, सीताराम जाधव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, जुना पुणे-मुंबई महामार्गावर न्यू इंग्लिश स्कूल शाळेजवळ एक स्कॉर्पिओ चारचाकी गाडीत रानडुक्कर या वन्यप्राण्याचे मांस अवैधरित्या शिकार करून वाहतूक करत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली.

त्यानंतर वडगाव मावळ वन विभागाने कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रानडुकराचे मांस, स्कॉर्पिओ असा एकूण सहा लाखांचा ऐवज जप्त करत पाच जणांना अटक केली. त्यांच्या विरोधात भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण, उप वनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक अतुल जैनक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ एस डी वरक, वन परिमंडळ अधिकारी मल्लिनाथ हिरेमठ, वनपाल देवले दया डोमे, वनरक्षक परमेश्वर कासुळे, वनरक्षक योगेश कोकाटे, वनरक्षक एस. के. मोरे, वनरक्षक कृष्णा देठे, वनरक्षक दीपक उबाळे व वनसेवक जांभूळकर यांच्या पथकाने केली