रानजाई महोत्सवात नेचर फॅशन वॉकचे आयोजन

0
145

पिंपरी, दि. ६ :- पाने, फुले, निसर्ग यांच्यावर आधारित फॅशन शो म्हणजेच ‘नेचर फॅशन वॉक’ या फॅशन शो ने नेहमीच्या रॅम्प वॉक परंपरेच्या पलीकडे जात विविध फुले व नैसर्गिक रंगसंगती दर्शविणाऱ्या डिझायनर वस्त्रांच्या माध्यमातून रंगतदार दर्शन घडवून पर्यावरण जनजागृतीद्वारे महत्व पटवून दिले.

‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान विभाग आणि महा फॅशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या नेचर फॅशन शो चे नुकतेच आयोजन रानजाई महोत्सवात करण्यात आले होते. लक्ष्मीकांत गुंड यांच्या संकल्पनेतून भारतीय संस्कृती फॅशन शो चे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जातात. तसेच आपल्या संस्थेच्या माध्यमातून गुंड हे नेहमीच फॅशन शोच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात.

पिंपरी चिंचवड येथील आय एन आय एफ डी फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी या फॅशन शोसाठी साजेशी वस्त्र निर्मिती केली होती. आय ए एस ए इंटरनॅशनल मेकअप अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सर्व मॉडेल्सची आकर्षक वेशभूषा व केशभूषा सादर केली. नैसर्गिक विविधता, फुले, झाडे तसेच निसर्ग संवर्धनाचे महत्त्व नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या शोचे आयोजन करण्यात आले होते. फॅशन शो कोरिओग्राफर अमोल मोरे यांच्या दिग्दर्शनातंर्गत ३५ मॉडेल्सनी यावेळी रॅम्प वॉक केला. या फॅशन शोच्या माध्यमातून उद्यान विभागाच्या वतीने कर्मचाऱ्यांचे गणवेश निसर्गसंगतीनुसार तयार करून घेण्यात आले आहेत. त्यात मातीप्रमाणे पॅन्टचा रंग तर हिरव्या सृष्टीप्रमाणे शर्टचा रंग अशा कल्पनेतून गणवेशाचा निसर्गाप्रमाणे अविष्कार घडविला आहे. या ड्रेस कोडचेही अनावरण यावेळी करण्यात आले. या फॅशन शो प्रसंगी “कन्नी” चित्रपटातील मराठी कलाकार ऋता दुर्गुळे, शशांक तावडे व ऋषी मनोहर यांनी रानजाई प्रदर्शनास सदिच्छा भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. त्या दरम्यान माझी वसुंधरा शपथही घेण्यात आली तसेच झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी आभार मानले.