राधानंद संगीत विद्यालयाचा “गुरुपूजन सोहळा”

0
208

सांगवी, दि. १५ (पीसीबी) – नटसम्राट निळू फुले नाट्यगृह,पिंपळे गुरव येथे स्व.शकुंतला नारायण ढोरे स्मृती प्रतिष्ठाण व कलाश्री संगीत मंडळ प्रस्तुत राधानंद संगीत विद्यालयाचा “गुरुपूजन सोहळा” संपन्न झाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन पं.सुनिल देशपांडे,पं.सुधाकरजी चव्हाण, चंद्रा रामय्या, प्रतिभा टांकसाळे,स्मिता कुर्वे,रघुनाथ राऊत व कविता ढोरे यांच्या शुभहस्ते झाले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला नंदकिशोर ढोरे व त्यांचे शिष्य यांनी बहारदारपने नांदी सादर करून कार्यक्रमाची दिमाखात सुरुवात केली. त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घराणेबाज सोलो व ग्रुप तबला वादन केले. विद्यार्थ्यांना हार्मोनियमासाठी सत्यवान पाटुळे व जान्हवी ढोरे यांनी तर स्वरसाथ सिद्धी ताजणे, श्रावणी विरोकर, श्रेया पोटले व श्रावणी पोटले यांनी केली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या पुष्पात सुनिलजी देशपांडे यांचे सोलो तबला वादन झाले. त्यांनी घराणेदार तबला वादनाचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. ताल तीनतालमध्ये पेशकार, कायदा, रेला व पारंपरिक बंदिश यांचे सादरीकरण केले. त्यांना हार्मोनिअमसाठी माधव मारणे यांनी साथ केली.

कार्यक्रमाचा समारोप सुधाकरजी चव्हाण यांच्या गायनाने झाला. त्यांनी विलंबित एकतालमध्ये “पग लगन दे” ही बंदीश सादर केली आणि द्रुत तीनतालमध्ये “मुख मोर मोर” ही बंदिश सादर केली. भक्तीरसपूर्ण भैरवी भजन गायनाने कार्यक्रमाची सांगता केली.त्यांना हार्मोनियमासाठी साथसंगत माधव मारणे, तबल्याची नंदकिशोर ढोरे तर टाळासाठी साथसंगत मकरंद बाद्रायणी यांनी केली.

कार्यक्रमासाठी संदेश राजे, जेष्ठ गायिका संध्या काथवटे व सुधीर दाभाडकर हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन आकाश थिटे यांनी तर छायांकन नामदेव तौर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन विदयाल्याचे संचालक व स्व.शकुंतला ना. ढोरे स्मृती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष नंदकिशोर ढोरे यांनी केले.