रात्री उशिरा जेवण न दिल्याने हॉटेल चालकाला बेदम मारहाण

0
531

चिखली, दि. ६ (पीसीबी) – हॉटेल बंद करताना आलेल्या ग्राहकांना जेवण देण्यास नकार दिल्याने तिघांनी मिळून हॉटेल चालकाला आणि अन्य दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 4) रात्री अकरा वाजताच्या सुमारास माऊली हॉटेल, चिखली येथे घडली.

ज्ञानेश्वर इलप्पा हेरवे (वय 26, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनेश खरात (वय 22) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे म्हेत्रे गार्डन रोडवर हॉटेल आहे. मंगळवारी रात्री अकरा वाजता ते हॉटेल बंद करत असताना दिनेश आणि त्याचे दोन साथीदार आले. त्यांनी जेवायला दे, अशी मागणी केली. मात्र हॉटेल बंद झाल्याने फिर्यादी यांनी आरोपींना जेवण दिले नाही. त्यानंतर हॉटेलच्या बाहेर असलेल्या टपरीवर आरोपी गेले. तिथे त्यांनी सिगारेट घेतली. टपरीवर असलेल्या फिर्यादी यांच्या मामांनी आरोपींना सिगारेटचे पैसे मागितले. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या मामांना मारहाण केली. ते भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. हॉटेल मधील कामगार भांडण सोडविण्यासाठी आला असता आरोपींनी कामगाराला देखील मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.