रात्रीच्या वेळी इलेक्ट्रिक दुकान पाडून लाखो रुपयांचे साहित्य चोरले

0
507

पिंपरी,दि.०६(पीसीबी) – रात्रीच्या वेळी एका टोळक्याने भाडेकरार सुरु असलेल्या जागेतील गुरुदेव इलेक्ट्रिक दुकान पाडले. दुकानातील सव्वापाच लाखांचे साहित्य आणि 25 हजार 600 रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 6) मध्यरात्री एक वाजल्यानंतर घडला.

याप्रकरणी अनिल गोविंदराम मुलचंदानी (रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यामध्ये स्कायलाईन बिल्डर्स अॅंड डेव्हलपर्स तर्फे भागीदार मनीष मोहन गोहिल, संदीप गोपालभाई टांक, रोहिदास विष्णू चव्हाण, हिरा रोहिदास चव्हाण, रुपेश रोहिदास चव्हाण, तनुजा रुपेश चव्हाण, शुभांगी बाळासाहेब देवकर, नमिता राजेंद्र परवडे, रसिका राहुल गुंजाळ व इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कासारवाडी येथे मुलचंदानी यांचे 300 चौरस फूट जागेत इलेक्ट्रिक दुकान आहे. दुकानाची जागा मुलचंदानी यांचे मेव्हणे श्रीचंद आसवानी यांनी मिळकतीचे मूळ मालक भगवान खंडू चव्हाण यांच्याकडून 2 नोव्हेंबर 1994 रोजी भाडे करारनामा करून व्यावसायिक वापरासाठी घेतली आहे. करारनाम्यात ठरल्यानुसार दरमहा 600 रुपये भाडे आजवर नियमितपणे दिले आहे. हा भाडेकरारनामा कोणत्याही प्रकारे रद्द केलेला नाही. अथवा तशी कोणतीही नोटीस मुलचंदानी आणि आसवानी यांना मिळालेली नाही.

दरम्यान, रोहिदास विष्णू चव्हाण, हिरा रोहिदास चव्हाण, रुपेश रोहिदास चव्हाण, तनुजा रुपेश चव्हाण, शुभांगी बाळासाहेब देवकर, नमिता राजेंद्र परवडे, रसिका राहुल गुंजाळ यांनी अर्जदार यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता स्कायलाईन बिल्डर्स अॅंड डेव्हलपर्स यांना विकसन करारनामा व कुलमुखत्यारपत्र करून विकसनासाठी दिल्याचे समजले. तक्रारदार हे मगील 30 वर्षांपासून त्या जागेत व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे हा विकसन करारनामा त्यांच्यावर बंधनकारक नाही.

या मिळकतीची माहिती महापालिकेपासून यातील संशयित लोकांनी लपवून ठेवली आहे. दुकानाच्या शांततामय कब्जे वहिवाटीस कोणत्याही प्रकारे हरकत करू नये यासाठी श्रीचंद आसवानी यांनी स्कायलाईन बिल्डर्स अॅंड डेव्हलपर्स तर्फे मनीष गोहिल, संदीप टांक व इतर लोकांवर न्यायालयात दिवाणी दावा खल केला. तो दावा अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे.

त्यानंतर आसवानी यांनी स्कायलाईन बिल्डर्स अॅंड डेव्हलपर्स तर्फे मनिष गोहिल, संदीप टांक यांच्या विरोधात पुणे जिल्हा न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे. हा दावा देखील प्रलंबित आहे. असे असताना स्कायलाईन बिल्डर्स अॅंड डेव्हलपर्स तर्फे मनीष गोहिल, संदीप टांक, रोहिदास विष्णू चव्हाण, हिरा रोहिदास चव्हाण, रुपेश रोहिदास चव्हाण, तनुजा रुपेश चव्हाण, शुभांगी बाळासाहेब देवकर, नमिता राजेंद्र परवडे, रसिका राहुल गुंजाळ यांनी पूर्वपरवानगी शिवाय सोमवारी मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्याने तक्रारदार यांचे दुकान पाडले. दुकानातील महत्वाची कागदपत्रे, 25 हजार 600 रुपये रोख रक्कम आणि पाच लाख 25 हजारांचा दुकानातील माल चोरून नेला. यामध्ये तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झाल्याने गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.