अमरावतीमध्ये लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांची उमेदवारी आणि आनंद अडसूळांचा तीव्र विरोध यामुळे कमालीची रंगत निर्माण झाली आहे. २०१४मध्ये आनंद अडसुळांचा नवनीत राणांनी पराभव केला होता. तेव्हापासून या दोघा नेत्यांमध्ये कमालीचा विरोध पाहायला मिळत आहे. त्यातच यावेळी नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे अमरावतीची उमेदवारी त्यांना जाहीर करण्यात आली. त्यामुळे आनंद अडसूळांनी त्याला विरोध केला असताना आज राणा दाम्पत्य थेट अभिजीत अडसूळ यांच्या घरी भेटीसाठी दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अमरावतीत अडसूळ विरुद्ध राणा हा वाद काही नवीन नाही. पण पहिल्यांदाच अडसूळ आणि राणा यांच्यात सख्य पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्य राम नवमीच्या निमित्ताने आनंद अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांच्या भेटीला गेले. त्यांनंतर अभिजीत अडसुळांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. “राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो किंवा कायमचा मित्र नसतो. ही लढाई देशाच्या पंतप्रधानांसाठी चालू आहे. ४०० पारचा आकडा आपण निश्चित केला आहे. मोदींसाठी सगळे लढण्यासाठी तयार आहेत. यासंदर्भात आम्ही चर्चा करू आणि त्यातून काहीतरी सकारात्मक येईल”, असं अभिजीत अडसूळ माध्यमांना म्हणाले.
“ही महाराष्ट्राची प्रथा, परंपरा आहे. आपल्या घरी कुणी पाहुणे आले तर आपण त्यांचं स्वागत करतो. आज राम नवमीच्या निमित्ताने रवी राणांकडून मेसेज आला की ते दोघे भेटायला येत आहेत. ते आमच्याकडे आले. आम्ही त्यांचं आदरातिथ्य केलं आहे”, असंही अभिजीत अडसूळ म्हणाले.
ओवैसींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “फक्त ‘खान की बाण’चं राजकारण…”
दरम्यान, नवनीत राणांच्या प्रचाराबाबत विचारणा केली असता आनंद अडसूळ यांनी टीव्ही ९ शी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली. “त्या दाम्पत्याला खरंच अक्कल आहे की नाही हा माझ्यापुढे प्रश्न आहे. नैतिकता तर नाहीच. आटापिटा करून त्या मंडळींनी मला थांबवलं आणि तिला उमेदवारी दिली. न्यायालयाची केसही मॅनेज केली. असं असताना हवा नाही म्हणते मग गेली कशाला तिथे? राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबर हवा असेल तर तिथेच थांबायला पाहिजे होतं. या सगळ्या गोष्टी अडाणीपणा, कृतघ्नपणाच्या आहेत”, असं आनंद अडसूळ म्हणाले.