राज ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहल्यावर विनायक राऊत स्पष्टच बोलले

0
186

मुंबई , दि. १६ (पीसीबी) – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीने आता वेगळे वळण घेतले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहीले. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यामध्ये भाजपने आपला उमेदवार मागे घ्यावा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी केले. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार विनायक राऊत  यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

“राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. एखाद्या लोकप्रतिनिधीचे आकस्मित निधन झाले असेल आणि निधन झालेल्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातल्या सदस्याकडून पोटनिवडणूक लढवत असेल, तर ती निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. हीच आपली खऱ्या अर्थाने संस्कृती आणि पंरपरा राहिली आहे. मात्र दुर्दैवाने मागील काळात या परंपरेत खंड पडला. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीपासून आता अंधेरीच्या निवडणुकीपर्यंत ही पंरपरा खंडीत झाली”, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

“देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे इतर बरेच पदाधिकारी हे जुने-जाणते नेतेमंडळी आहेत. यांच्या मनात कोणी संभ्रम निर्माण केला असेल आणि भाजपाने पोटनिवडणुकीत उमेदवार दिला असेल, तर ते बरोबर नाही. आम्ही आज जनतेत फिरत असतो, यावेळी लोकांमध्ये चीड असल्याचे दिसत आहे. या सर्वाचा विचार करता, राज ठाकरेंनी जे आवाहन केले, त्याला देवेंद्र फडणवीसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.”, असेही राऊत म्हणाले.