राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी ५ लाख लोक जमतील; बृजभूषण सिंह यांचा दावा फोल ठरला, प्रत्यक्षात…

0
431

मुंबई,दि.०६(पीसीबी) – भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी शरयू नदीच्या काठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा फज्जा उडाल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, बृजभूषण सिंह यांच्या कडव्या विरोधामुळे राज ठाकरे यांना हा दौरा पुढे ढकलावा लागला होता. राज ठाकरे ज्यादिवशी अयोध्येत येतील त्याचदिवशी बृजभूषण सिंह यांनी आपल्या समर्थकांसह शरयू स्नानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला तब्बल पाच लाख लोक जमतील, असा दावा बृजभूषण सिंह यांनी केला होता.

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतरही बृजभूषण सिंह आपल्या भूमिकेवर ठाम होते. राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी आयोजित केलेले त्यांचे सर्व कार्यक्रम नियोजनानुसार पार पडले होते. यामध्ये रविवारी झालेल्या शरयू स्नानाचाही समावेश होता. या कार्यक्रमाला ५ लाख लोक जमतील, अशी भीमगर्जना बृजभूषण सिंह यांनी केली होती. मात्र, प्रत्यक्षात या कार्यक्रमाला २००० ते २५०० लोकांचीच गर्दी जमल्याची माहिती पुढे आली आहे.

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला असला तरी रविवारी मनसेचे नेते अविनाश जाधव आणि इतर कार्यकर्ते अयोध्येत गेले होते. त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर फेसबुक लाईव्ह केले होते. तसेच मनसेचे कार्यकर्ते शरयू नदीवरही जाऊन आले होते. आम्ही त्याठिकाणी गेलो तेव्हा शरयू नदीच्या काठावर फारतर १०० ते १५० लोक जमले होते. त्यानंतर कार्यक्रम सुरु होईपर्यंत याठिकाणी दोन-अडीच हजारांचीच गर्दी जमली होती, असा दावा अविनाश जाधव यांनी केला. या सगळ्यावरुन बृजभूषण सिंह यांची ताकद किती आहे, हे समजले. राज ठाकरे यांच्या सभेला त्यांना ऐकण्यासाठी लाखो लोक येतात. पण बृजभूषण सिंह यांना पाच लाख लोक येतील असा दावा करून त्याठिकाणी प्रत्यक्षात दोन-अडीच हजार जणच आले. मी अयोध्येत असताना तेथील अनेक लोकांशी, साधू-महंतांशी संवाद साधला. या सगळ्यांना राज ठाकरेंनी अयोध्येत यावे, असे वाटत असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.