राज ठाकरेंच्या गाड्यांपुढे सुपाऱ्या फेकल्याने गोंधळ

0
69

बीड, दि. ९ ऑगस्ट (पीसीबी) – गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षण आंदोलनानं धुमसत असलेल्या मराठवाड्यात राज ठाकरेंचा दौरा सुरू आहे. राज ठाकरे आता बीडमध्ये दाखल झालेत. पण तिथे त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला. राज ठाकरे सुपारीबाज आहेत असं म्हणत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर सुपाऱ्या फेकल्या. पोलिसांनी त्यांना आवरलं आणि राज यांच्या ताफ्याला वाट करून दिली. या गोंधळानंतर मनसने इशारावजा धमकी दिली आहे.मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्हिडीओ शेअर करत ताफा अडवणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. संदीप देशपांडे म्हणाले, उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सांगत आहे, सुरूवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करणार आहे.

राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत चुकीची भूमिका घेतली, आरक्षणाविरोधात बोललेलं आम्ही सहन करणार नाही असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. आतापर्यंत मराठवाड्यात मराठा आंदोलकांच्या रोषाला राज ठाकरेंना सामोरं जावं लागत होतं. आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच त्यांच्या भूमिकेचा निषेध करत आंदोलन केलं. एकीकडे हा विरोध असताना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मात्र राज ठाकरेंचं जंगी स्वागत होतंय.

राज ठाकरे यांचे बीड शहरामध्ये आगमन झाल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र केवळ राजकीय विरोधातून हा प्रयत्न झाला आहे. याचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. मनसे शहराध्यक्ष करण लोंढे आणि शैलेश जाधव या दोघांनी आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे काही काळ मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांचे शर्ट सुद्धा फाटले आहे.