राज ठाकरेंचा मोठा निर्णय! बदलापूर प्रकरणातील ‘ती’ रणरागिणी विधानसभेच्या रिंगणात

0
2

मुंबई, दि. 23 (पीसीबी) : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकांच्या निकालाची घोषणा केली जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी घोषित केल्या जात आहेत. त्यातच नुकतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दुसरी उमेदवार यादी घोषित करण्यात आली आहे. या उमेदवार यादीत 45 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे.

मनसेने काल रात्री उशिरा आगामी विधानसभा निवडणुका लढणाऱ्या उमेदवारांची यादी घोषित केली. या यादीत ४५ जणांचा समावेश असून मनसेकडून आतापर्यंत ४७ उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. मनसेने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत दोन महिला उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे.

मनसेने जाहीर केलेल्या यादीत मुरबाड विधानसभा मतदारसंघातून संगिता चेंदवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संगिता चेंदवणकर या मनसेच्या बदलापूर महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. यात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. पण संगिता चेंदवणकर यांच्या पुढाकारामुळे गुन्हा दाखल झाला होता. तसेच बदलापूरकरांनी जनआंदोलनही केले होते. याचे नतेृत्व संगिता चेंदवणकर यांनी केले होते. या घटनेला वाचा फोडणाऱ्या संगिता चेंदवणकर यांचे राज ठाकरे यांनी कौतुक केले होते. तसेच आता संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेवराई विधानसभा मतदारसंघातून महिला उमेदवाराला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेकडून गेवराई मतदारसंघातून सौ. मयुरी बाळासाहेब म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात अनेक महत्त्वपूर्ण लढाई पाहायला मिळणार आहेत