राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर उद्य मला मरण आले तरी खंत नाही…

0
3

दि . ४ ( पीसीबी ) – राज्य सरकारला शाळांमधील हिंदी सक्तीचा जीआर मागे घ्यायला लावल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे दोन्ही नेते शनिवारी विजयी मेळाव्यासाठी एकत्र येणार आहेत. अनेक वर्षांनी या दोन्ही बंधूंचे मनोमिलन होणार असल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शुक्रवारी दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यानंतर ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना प्रकाश महाजन अत्यंत भावूक होताना दिसले. राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर उद्य मला मरण आले तरी खंत नाही. मी उद्या मेलो तर वर जाऊन बाळासाहेब ठाकरेंना राज-उद्धव एकत्र आल्याचे सांगेन, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतानाचा हा क्षण पाहायला बाळासाहेब ठाकरे हवे होते. हीच गोष्ट सांगण्यासाठी मी आज बाळासाहेबांच्या समाधीपाशी आलो होतो. मी त्यांना प्रत्यक्षात ही गोष्ट सांगू शकत नाही. पण उद्याच्या सोहळ्यानंतर मला मरण आले तर मी वर जाऊन बाळासाहेबांना सांगेन की, राज-उद्धव एकत्र येण्याचा सोहळा मी पाहिलाय. दोन भाऊ मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आले आहेत. मी हा आनंदसोहळा आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे. बाळासाहेब तुम्ही आता महाराष्ट्राची चिंता करु नका, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.

अलीकडच्या काळात मी पक्षशिस्त झुगारुन दोन्ही भावांनी एकत्र आले पाहिजे, असे वक्तव्य प्रसारमाध्यमांसमोर केले होते. मी दोन्ही नेत्यांसोबत दौरे केले आहेत. माझे नेते राज ठाकरे हे जळजळते निखारे आहेत तर उद्धव ठाकरे शीतल आहेत. मी आभार मानतो, शरद पवार साहेब यांचे त्यांनी सांगितले की, राज साहेब यांच्या सभेला गर्दी होते आणि उद्धवजींच्या सभेच्या गर्दीचे मतात रूपांतर होते. आता ही गर्दी आणि मतांच रूपांतर एकत्र होणार आहे, हा आनंदाचा क्षण आहे, असे प्रकाश महाजन यांनी सांगितले.

मी माझे दोन्ही भाऊ गमावले. भाऊ हा आधार असतो. उद्या हे दोन भाऊ एकत्र येणार आहेत. या दोघांना एकमेकांचा आधार मिळणार आहे. मराठी माणसासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र कायम राहतील, हे मी सांगतो. महाराष्ट्रात तरुण नेता आला तर तो सर्वांना सोबत घेतो. आज आमची सर्वांची आणि बाळासाहेबांची इच्छा पूर्ण होणार आहे. त्या दोन सिंहांनी एकत्र येऊ नये म्हणून कोल्हे तोंड काढत आहेत. त्यांना मालकला खुश करायचं आहे. आता ब्रह्मदेव खाली उतरला तरी मराठी माणसासाठी झालेली ही युती तोडू शकत नाही. हे दोन भाऊ मराठी माणसासाठी हक्काचं ठिकाण झाले आहेत, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.