राज्य सहकारी बँक घोटाळ्यातून अजित व सुनेत्रा पवार यांचे नाव वगळले, राष्ट्रवादीचे प्राजक्त व प्रसाद तनपुरे यांचे कायम

0
392

मुंबई, दि. १ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचानलयाने (ईडी) दाखल केलेल्या पुरवणी आरोप पत्रात एकूण १४ नावांचा समावेश आहे. मात्र, त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या आरोप पत्रात मुख्यमंत्री शिंदे गटाच्या एक नेत्याचे नाव असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

ईडीने दाखल केलेल्या या पुरवणी आरोप पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, भाजप आमदार सुभाष देशमुख, काँग्रेस नेते रणजित देशमुख, प्रसाद सागर, शिवसेनेच्या शिंदे गटाचे अर्जून खोतकर यांच्यासह अन्य काही नावे आहेत. मात्र, या आरोप पत्रात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उल्लेख नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.


बंद पडलेले साखर कारखाने कमी पैशात विकत घेण्याबाबत आलेल्या तक्रारीची चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. मात्र, आरोप पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला असून या दोघांची नावे नव्या आरोप पत्रात नसल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने मार्च महिन्यात जेव्हा आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित काही कंपन्यांवर आरोपपत्र ठेवण्यात आले होते. मात्र, त्याचे नाव आरोप पत्रात नव्हते.

राज्य सहकारी बॅंकेने निर्धारीत केलेल्या विक्री प्रक्रियेचे पालन न करता राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची अल्पदरात विक्री करण्यात आल्याचे आढळून आले होते. त्या प्रकारणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २६ ऑगस्ट २०१९ मध्ये पहिल्यांदा गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे, असे वृत्त एका वृत्तवहिनीने दिले आहे.
गैरव्यवहारात कोणाचाही सहभाग आढळल्यास पुरवणी आरोप पत्र दाखल करता येतं, असे यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.