राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची फाईल बंद

0
176

मुंबई, दि. २ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण (ईओडब्ल्यू) विभागाने विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी विशेष न्यायालयाचे न्या. राहुल रोकडे यांच्यापुढे ‘सी’ समरी अहवाल सादर केला आहे. आता याबाबत 15 मार्चला सुनावणी होणार आहे. त्यामुळे अजित पवार यांना दिलासा मिळाल्याचं म्हटलं जातंय.

“शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा”
मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी अजित पवार यंच्याविरोधात काही ठोस पुरावे सापडले नसल्याचं म्हटलं आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने ‘क्लोजर रिपोर्ट’ न्यायालयात सादर केला आहे. आता पोलिसांनी दाखल केलेला ‘सी’ समरी रिपोर्ट स्वीकारायचा की तो रिपोर्ट नाकारून पोलिसांना या प्रकरणात आरोपपत्र सादर करण्याचे निर्देश द्यायचे, याबाबत विशेष न्यायालय निर्णय घेईल.

या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट देण्यात आल्याने विरोधकांनी टीका करण्यास सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देत टीका केली आहे. यावेळी राऊत यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया
“देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. नवाब मलिक यांच्या बाजूला आम्ही अजित पवार यांनाही तुरुंगात पाठवू असं फडणवीस सांगत होते. आता हेच दोन्ही लोक भाजपाबरोबर आहेत. याबाबत फडणवीसांना विचारलं पाहिजे. फडणवीस लोकांशी खोटं बोलत आहेत. देशाशी, राज्याशी ते खोटं बोलत आहेत,” असा आरोपच संजय राऊत यांनी केला आहे.

‘सी’ समरी म्हणजे काय?
चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला जातो किंवा गुन्हा दिवाणी स्वरुपाचा असतो, तेव्हा पोलीस ‘सी’ समरी रिपोर्ट दाखल करतात. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी 20 जानेवारी रोजी पोलिसांनी ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला होता.