राज्य सरकारच बरखास्त करण्याची काँग्रेसची मागणी

0
359

मुंबई, दि. १९ (पीसीबी) : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या सोहळ्यात काही लोकांना उष्माघाताचा तडाखा बसला. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे अनेकांना अस्वस्थ वाटत होतं. या सर्वांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आता या घटनेमुळे आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागावा अशी मागणी केली आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट राज्य सरकारच बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. तसेच या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतोय, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. नाना पटोले यांनी एक व्हिडीओही ट्विट केला आहे. पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ आहे. त्यात प्रचंड गर्दी दिसत आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही ट्विट करून महत्त्वाची माहिती दिली आहे. काँग्रेस महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात काय घडलं याची माहिती जनतेसमोर ठेवणार आहे. काँग्रेस पक्षातर्फे 24 एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेचे सत्य जनतेसमोर मांडणार आहोत, असं अतुल लोंढे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागितला आहे. मतांच्या राजकारणासाठी एकनाथ शिंदे यांनी गर्दी जमवली. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा शब्द डावलून ही गर्दी जमवण्यात आली. त्यामुळे या दुर्घटनेची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.