मुंबई: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये ४ दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पर्यटकांची संख्या जास्त आहे. पहलगाममध्ये असलेल्या बैसरण खोऱ्यात फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. त्या दहशतवाद्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. यानंतर केंद्र सरकारनं भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कालच संवाद साधला. यानंतर दुसऱ्याच दिवशी चिंताजनक माहिती समोर आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयानं आदेश दिल्यानंतर राज्यातील प्रशासन कामाला लागलं. राज्य सरकारनं शोध मोही हाती घेतली. यातून समोर आलेली आकडेवारी चिंताजनक आहे. राज्यातील ४८ शहरांमध्ये ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. यातील केवळ ५१ जणांकडे वैध कागदपत्रं आहेत. तर १०७ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सरकारी यंत्रणांना लागलेला नाही. त्यामुळे १०७ पाकिस्तानी नागरीक नेमके गेले कुठे, ते कोण आहेत, ते सध्या काय करतात, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.