मुंबई, दि. २ (पीसीबी) : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर बेकायदा मालमत्तेबाबत सीबीआय कडून चौकशी सुरु होती. त्यात आज त्यांना मोठा दिलासा मिळाला. सीबीआयने या प्रकरणी न्यायालयात क्लोझर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामुळे याबाबत अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाल्याचे बोलले जाते. याप्रकरणी सातत्याने मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणारे भाजप नेते किरीट सोमय्या मात्र तोंडघशी पडल्याचे चित्र आहेत.
उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याला सीबीआयकडून दिलासा
याबाबत निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका `इडी` ने यापूर्वी जप्त केले होते. या प्रकरणात पुरेसे सबळ पुरावे नसल्याचे सांगत सीबीआयने न्यायालयात क्लोझर रिपोर्ट दिला आहे. त्यामुळे हा खटला बंद करण्याची प्रक्रीया होऊ शकते. त्यामुळे श्री. पाटणकर यांना दिलासा मिळाला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत सातत्याने आरोप करीत माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. त्यांनी सातत्याने आरोप करीत याबाबत आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचा दावा केला होता. त्यानुसार त्यांनी काही कागदपत्र `इडी` ला दिले होते. `इडी` कडून त्याची चौकशी देखील सुरु होती. त्यामुळे सीबीआयच्या क्लोझर रिपोर्टला `इडी` ने विरोध केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केली होती. त्या कालावधीत श्री. पाटणकर यांनी आपले पैसे बँकेमार्फत विविध कंपन्यांकडे वर्ग केले होते. हे फंडींग नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच पैशांतून निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका खरेदी केल्याची तक्रार होती. याबाबत यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयाला तपास यंत्रणेने क्लोझर रिपोर्ट सादर केला होता. मात्र तेव्हा न्यायालयाने तो फेटाळला होता.
पुष्पक बुलीयन कंपनीने आपला निधी नंदकिशोर चर्तुवेदी यांच्याकडे वर्ग केला होता. चर्तुवेदी यांच्याकडून साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लिमीटेड प्रकल्पाला ३० कोटीचे फंडींग झाले होते. साईबाबा गृहनिर्माण कंपनीचे संचालक श्री. पाटणकर आहेत. त्यातूनच निलांबरी प्रकल्पात ६.४५ कोटींचे ११ फ्लॅट खरेदी केल्याची तक्रार होती.