राज्यात लवकरच महाआघाडीचे सरकार दिसेल

0
330

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी सतत विविध प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरत असतात. मात्र आता मिटकरी यांच्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे. “तारीख आणि वेळ लिहून घ्या, या सरकारचा काउंटडाऊन सुरू झाला आहे. हे सरकार फार दिवस टिकणार नाही.” मिटकरी यांच्या दाव्यामुळे सरकार बदलाच्या चर्चेत अणखी भर पडली आहे.

तसेच जाणीवपूर्वक दबाव टाकून राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा धक्कादायक आरोप देखील मिटकरी यांनी केला आहे. तसेच या राज्याला चांगल्या पध्दतीचं महाविकास आघाडीचे सरकार लवकरच दिसेल असं देखील मिटकरी म्हणाले. मिटकरी यांच्या या दाव्याने सत्ताधाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सत्तासंघर्षाचा निकाल येण्या आगोदरच राज्यात नवं सरकार येणार अश्या दावामुळे सत्ताधारी आमदारांची झोप उडाली आहे.

दरम्यान महाविकास आघाडीची नागपूरात दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे. यावेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान, विरोधपक्ष नेते अजित पवार या सभेला उपस्थित राहणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते, मात्र ते नागपुरातील सभेला हजर राहणार आहेत. तर आजच्या सभेला अजित पवारांच्या उपस्थितीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.