राज्यात मध्यावधी निवडणुका होतील – आदित्य ठाकरे

0
453

– औरंगाबादमधील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे दौऱ्याला मोठा प्रतिसाद

औरंगाबाद, दि. २३ (पीसीबी) – औरंगाबादमधील पाच बंडखोर आमदार पडणार, नवे आमदार निवडून येतील, असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे. राज्यातील शिंदे सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही, लवकरच राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असेही आदित्य ठाकरे म्हणाले. पुढील निवडणुकीत बंडखोरांना धडा शिकवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बंडखोर आमदारांच्या पोटात नेमकं काय दुखलं, असा सवाल त्यांनी विचारला आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली आहे. औरंगाबादमधील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे दौरा करीत आहेत.

या बंडखोर आमदारांना अपचन झाले-आदित्य
४० आमदारांना जास्त दिलं, त्यांना त्याचं अपचन झालं, ही आमची चूक झाली असेल असे आदित्य ठाकरे म्हणाले. या ४० गद्दार आमदारांबद्दल द्वेष नाही, पण दुख आहे असे त्यांनी सांगितले. या आमदारांनी आपल्या आणि वडील उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचं सगळं चांगलं चाललं होतं, त्याला कुणाची तरी नजर लागल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात उद्धव ठाकरे सरकारने कर्जमाफी केली, रस्ते होत होते, पर्यटनाचा विकास होत होता, असे त्यांनी सांगितले. संभाजीनगर, धाराशीव याच्या नामांतराचं श्रेय घेण्याचाही त्यांनी यावेळी प्रयत्न केला. ज्या पक्षानी सर्व काही दिले त्यांनी पाठीत खंजीर का खुपसला असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विश्वासघात केला असे वाटत असेल तर परत या- आदित्य
जिथे गेला आहात तिथे आनंदात राहा. तुमच्यावर काही दडपणं आली असतील. स्वताला वॉशिंग मशिनमध्ये टाकलंय तर स्वच्छ धुवून या. पण लाज बाळगा आणि आमदारकीचा राजीनामा द्या, असं आव्हान त्यांनी बंडखोरांना केलं आहे. ज्यांना असं वाटत असेल की गद्दारी केली, विश्वासघात केला असं वाटत असेल तर मातोश्रीवर परत या, आमचं मन मोठं आहे. ही केलेली गद्दारी ही माणुसकीशी असलेली गद्दारी असते असे त्यांनी सांगितले.