राज्यात भाजप ३२ जागा लढणार, अजित पवार गटाला मावळ, बारामती, शिरूरसह सहा जागा

0
233

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार याची देशात उत्सुकता लागून राहिली आहे. राज्यातही निवडणुकीचे पडसाद उमटायला लागले आहेत. भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या भाजप-शिवसेना (शिंदे गट)- राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीतही महायुती लढणार आहेत. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून जागावाटपाच्या चर्चांवरुन वातावरण तापलं होतं. मात्र, अखेर भाजपकडून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजप राज्यात सर्वाधिक ३२ जागांवर लढणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

सूत्रांनुसार, राज्यात भाजप ३२ जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. अजित पवार गटाला ६ तर शिंदे गटाला १० जागांवर समाधान मानावे लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला १० जागा दिल्या जाणार असल्याची माहिती आहे. तर, राज्यात भाजप सर्वाधिक जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. अजित पवार गटाला सातारा, रायगड, मावळ, बारामती, शिरूर, भंडारा गोंदिया मतदारसंघ मिळणार असल्याची माहिती समोर येतेय.

भाजप 32 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. लोकसभेसाठी भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना हे सूत्र ठरलं आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने महायुतीत भाजप मोठा भाऊ असणार स्पष्ट होतंय. मेरिटनुसार, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे उमेदवार किती जागांवर निवडून येऊ शकतात याचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यामुळं जे उमेदवार निवडून येऊ शकतात त्यांनाच तिकिट द्यायचे, असे ठरले आहे. या संदर्भात निश्चिततादेखील झाली आहे. त्याची आकडेवारीही भाजपकडे आहे. त्यामुळंच भाजप सर्वाधिक म्हणजेच 32 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती कळतेय.

मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांची युती होती. भाजपसोबत शिवसेना होती त्यामुळं जागावाटपाबाबत दोन्ही पक्षात चढाओढ पाहायला मिळाली होती. मागील लोकसभेला भाजपला 23 जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता मागील निवडणुकीच्या तुलनेने 9 जागा अधिक भाजपच्या वाटेला आल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या गटाला 10 जागा मिळणार असल्याचे बोलले जाते. मात्र हे दहाही उमेदवार निश्चित निवडून येतील याची खात्री बाळगली जात आहे. जागावाटपाबाबत प्राथमिक स्तरावर बोलणी आहे. लवकरच याला अंतिम स्वरुप देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

संपूर्ण पुणे जिल्हा अजितदादांकडे –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्विवाद वर्चस्व असल्याने पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि मावळ या तीनही जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्या. बारामतीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे या दोन्ही विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याने त्यांच्या विरोधात कोणाला संधी द्यायची यावर घोडं अडलयं. मावळात शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांना थेट प्रचाराला लागा असा संदेश मिळाल्याने त्यांनी दौरे सुरू केले. प्रत्यक्षात अजित पवार हे त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या २०१९ च्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी मावळ लढण्यासाठी विशेष आग्रही असल्याचे समजले. मावळात पार्थ पवार हे उमेदवार झाले तर शिंदे गटाचे बारणे यांची अडचण होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातूनही डॉ. कोल्हे यांच्या विरोधात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटातून प्रबळ दावेदार आहेत. प्रत्यक्षात ही जागा अजित पवार यांच्या वाट्याला गेल्याने तिथे आढळराव यांना घड्याळ चिन्हा घेऊन लढावे लागणार अशी शक्यता आहे. शिरूर मध्ये पार्थ पवार यांचेही नाव चर्चेत आहे. तीनही लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या उमेदवारांना संधी दिली तर शिवसेना शिंदे गट नाराज होणार असल्याने महायुतीत संभ्रम आहे.