मुंबई, दि. १३ (पीसीबी) – महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महिला आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी ही चिंता व्यक्त केली. तसंच कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती केली जाते आहे त्यावर त्यांनी भाष्य केलं. मात्र राज्यातून १९ हजारांहून अधिक महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत असं म्हणत सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
“महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था यासंबंधीची चर्चा सुरु आहे. नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहराबाबत वेगळ्या पद्धतीने बोललं जातं. त्याविषयी माहिती घेतल्यावर काही गोष्टी समोर आल्या. पावसाळी अधिवेशन झालं त्यातही आमच्या सहकाऱ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. १ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२३ या पाच महिन्यांच्या कालावधीत १९ हजार ५५३ महिला आणि मुली बेपत्ता झाल्या. यामध्ये १८ वर्षांखालील १४५३ मुलींचा समावेश आहे. ही संख्या पाहिल्यानंतर स्थिती अत्यंत गंभीर आहे हे कळतं. राज्य सरकार आणि गृहखातं याची गांभीर्याने नोंद घेईल आणि उपाय योजना करेल अशी अपेक्षा आहे.”
कंत्राटी पद्धतीऐवजी कायमस्वरुपी भरती केली जावी
शासकीय भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मला जे शिष्टमंडळ भेटलं त्यांनी काही मुद्दे माझ्याकडे मांडले. पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ही भरती ११ महिन्यांसाठीच असल्याने पुढे काय? असा प्रश्न निर्माण होणार आहे. कंत्राटी पद्धतीचा कार्यकाळ ११ महिन्यांचा असल्याने ज्या जबाबदाऱ्या दिल्या जातील त्या कशा पूर्ण होतील हा प्रश्नही आहेच असंही शरद पवार म्हणाले. त्यामुळे कंत्राटी पद्धतीच्या ऐवजी कायमस्वरुपी भरती केली जावी अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे तसंच त्यात पारदर्शकता असावी असंही शरद पवार म्हणाले.










































