दि. ३ ( पीसीबी ) – महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळाच्या बसस्थानकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुण्यातील एका घटनेनंतर हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. महामंडळाची ढासळलेली आर्थिक स्थिती आणि काटकसरीच्या धोरणामुळे सुरक्षा व्यवस्थेवरील खर्चात कपात करण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणून, राज्यातील ५४५ बसस्थानकांवर एकही सुरक्षारक्षक नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
सुरक्षारक्षकांची वानवा :
मध्यवर्ती बसस्थानके वगळता, इतर ठिकाणी सुरक्षारक्षक नाहीत. महामंडळाने फक्त मध्यवर्ती बसस्थानकांसाठीच सुरक्षा रक्षकांची तरतूद केली आहे, आणि तीही जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीच. अशा ठिकाणी १८ पेक्षा जास्त सुरक्षारक्षक नसावेत, अशी अट आहे (अपवाद: पुणे येथील स्वारगेट आणि शिवाजीनगर – प्रत्येकी २३).
३२ मध्यवर्ती बसस्थानकांवर प्रत्येकी १८ यानुसार ५७६ आणि पुणे येथील दोन बसस्थानकांवर जादा दहा सुरक्षा रक्षक मिळून ५८६ जणांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. परंतु, त्याहूनही कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम भागवले जात आहे.
सुरक्षा व दक्षता खाते हतबल :
एसटीचे सुरक्षा व दक्षता खाते कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हतबल झाले आहे. मूळ कामांव्यतिरिक्त इतर जबाबदाऱ्या वाढवून देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी आठ पदे मंजूर असताना, केवळ तिघांवर काम चालवले जात आहे.