राज्यातील सरकार म्हणजे ‘खोके’ सरकार

0
433

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पुण्याच्या विकासाचे ८७५ कोटी रूपये शिंदे-फडणवीस सरकारने अडवून ठेवले आहेत. पालकमंत्री नियुक्त होईपर्यंत त्याविषयी काहीही करायचे नाही, अशा अधिकाऱ्यांना सूचना आहेत, असे सांगत मुखयमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांचाच कारभार सुरू असून अजूनही पालकमंत्री नेमलेले नाहीत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांची केली आहे. राज्यातील सरकार म्हणजे ‘खोके’ सरकार आहे, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.शिरूर विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच नोकरी व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शिरूरचे आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, सरकार येतात आणि जातात. मात्र, पहिल्या सरकारने मंजूर केलेली आणि कार्यवाहीच्या अंतिम टप्प्यात असलेली कामे नंतरच्या सरकारने अडवून धरणे चुकीचे आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये १४ हजार कोटी रूपयांचा निधी दिला, त्यात पुण्याला ८७५ कोटींचा निधी आहे. मात्र सध्याच्या स्थगिती सरकारने सगळं अडवून ठेवले आहे. जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेले नाही. सरकारला बाकीच्या कामांसाठी वेळ आहे, महत्त्वाच्या कामांसाठी नाही. बोललो की त्यांना मिरच्या झोंबतात. विकासकामांना स्थगिती देण्याचा सपाटा नव्या सरकारने लावला आहे. म्हणूनच आम्ही त्यांना स्थगिती सरकार म्हणतो. ही स्थगिती लवकरच उठवू, असे ते नुसतेच म्हणतात. प्रत्यक्षात कृती होताना दिसत नाही.

शेतकऱ्यांसाठी मंजूर निधी अडवणे योग्य नाही. शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे, तो कणा मोडला तर राज्य मोडून पडेल, ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणून दिल्याचे पवार म्हणाले.राज्यातील सरकार किती दिवस टिकेल, याविषयी शासनातील अधिकाऱ्यांना शंका वाटते. त्यामुळे त्यांचे निवांत काम सुरू आहे. ‘५० खोके, एकदम ओके’ ही घोषणा महाराष्ट्रातील गावागावात पोहोचली आहे. संबंधित फुटीर आमदारांना त्यांच्या मतदरासंघातील जनताच यावरून जाब विचारत आहे. इंधनदरवाढ, बेरोजगारी, महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केंद्र सरकार मात्र बनवाबनवी करत आहे. महत्वाच्या विषयांवर ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.