राज्यातील मनपाच्या निवडणुका घ्यायला भाजप घाबरते – सुलभा उबाळे

0
286

शिवसेनेच्या वतीने “होऊ द्या चर्चा” अभियानाद्वारे शहरात नागरिकांची जनजागृती

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मते मिळवणारे राज्यातील भाजपचे नेते दिल्लीत दहा वेळा जाऊन मुजरा करतात आणि महाराष्ट्राला झुकवण्याचे पाप करत आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांचे धोरण लोकशाहीला मारक आहे. त्यांनी शिवसेना आणि एनसीपी वर दरोडा घालण्याचे काम केले आहे. शरद पवार यांच्या सारखे ज्येष्ठ नेत्यांचे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे घर फोडण्याचे पाप भाजपा ने केले आहे. आमदार फोडताना वैचारिक पातळी ठेवली नाही. त्यांनी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह चोरण्याचे पाप केले आहे. त्यांची वृत्ती चांगली नाही. इडी, आयटी, सीबीआय अशा केंद्रीय संस्थांची धमकी देऊन त्यांनी राज्यात सत्ता हस्तगत केली आहे. देशात 28 राज्यात भाजप विरोधात सरकार आहेत. जिथे सत्ता मिळत नाही तिथे उदाहरणार्थ कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र येथे त्यांनी आमदार पळवण्याचे पाप केले आहे. दिल्लीमध्ये देखील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्रास देऊन सत्ता हस्तगत करण्याचे त्यांचे कुटील राजकारण आहे. यांना फक्त निवडणुकीत जुमले बाजी करून लोकसभा निवडणूक जिंकायची आहे. यांचा कुटील डाव मतदार राजा आता हाणून पाडणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेसह राज्यात अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यास भाजप घाबरत आहे. मागील दीड वर्षांपासून या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे. पिंपरी चिंचवड मधील नागरिक या राजवटीमुळे त्रस्त झाले आहेत. त्यांचा आक्रोश येणाऱ्या निवडणुकीत मतदान पेटीतून व्यक्त होणार आहे याची जाणीव असल्यामुळेच भारतीय जनता पार्टी निवडणुका घेत नाही अशीच जहरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केली.
पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्या हस्ते “होऊ द्या चर्चा” या अभियानाचे उद्घाटन आणि पथनाट्याचे उद्घाटन बुधवारी तळवडे येथे करण्यात आले. यावेळी
भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, माजी नगरसेविका विजया जाधव, पिंपरी चिंचवड शहर समन्वयक कैलास नेवासकर, माजी शहर उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, शहर संघटक संतोष तानाजी वाळके, युवराज कोकाटे, रावसाहेब थोरात, प्रवीण रजपूत,उपशहर प्रमुख अनिल सोमवंशी, शैलेश मोरे, युवा सेना जिल्हाधिकारी सचिन सानप, पुणे जिल्हा समन्वयक आरोग्य सेना सुखदेव नरळे, भोसरी विधानसभा संघटक दादासाहेब नरळे, महिला आघाडी संघटिका रूपालीताई शेटे, आशाताई भालेकर, विभाग प्रमुख नितीन बोंडे, उपविभाग प्रमुख पांडुरंग कदम, नागेश अजून, प्रवीण पाटील, गणेश भिंगारे, अभिजीत जाधव, शाखाप्रमुख सतीश कंठाळे, अभिमन्यू सोनसाळे, सर्जेराव कचरे, नंदू चव्हाण, दीपक कदम, मोहन जाधव, भरत पाटील, बाळासाहेब वरे, कैलास तोडकर, भोसरी विधानसभा समन्वयक राजेंद्र राठोड आदींसह बहुसंख्य युवा, महिला मतदार उपस्थित होते.
बुधवारी तळवडे मधील रुपीनगर, चिखली मधील ताम्हणे वस्ती आणि चिखली तळवडे रोड, गुरुवारी अजंठा नगर, महात्मा फुले नगर, घरकुल तर शुक्रवारी चिखली मधील मोरे वस्ती, अष्टविनायक चौक, टाळगाव चिखली चौक येथे रथ फिरवून नागरिकांशी संवाद साधण्यात आला आणि “होऊ दे चर्चा” हे अभियान राबविण्यात आले.
शनिवारी भोसरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, जय महाराष्ट्र चौक, दिघी रोड राहुल गवळी संपर्क कार्यालय येथे आणि रविवारी दिघी मधील धर्मवीर संभाजी राजे चौक, आदर्श नगर संभाजीनगर, चौधरी पार्क, गणेश नगर येथे हे अभियान राबवण्यात येणार आहे. बुधवारी (दि.११ ऑक्टोबर) रोजी अभियानाचा समारोप होणार आहे अशी माहिती शिवसेना शहर संघटक संतोष तानाजी वाळके यांनी दिली आहे.