राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी कमी

0
265

मुंबई दि.१४ (पीसीबी)- राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेला मोठी भेट दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात पेट्रोलवरील करात ५ रुपये आणि डिझेलवरील करामध्ये ३ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ५ आणि ३ रुपयंनी कमी होणार आहेत.

याबाबत घोषणा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, पेट्रोल डिझेलचे दर हे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून आहेत. केंद्राने ४ नोव्हेंबर २०२१ आणि २२ मे २०२२ रोजी केंद्राने करात कपात केली होती. त्यानंतर राज्यांनाही आवाहन केलं होतं. काही राज्यांनी कर कमी केले होते. मात्र महाराष्ट्रात ते कर कमी झाले नव्हते. आज आम्ही पेट्रोलवरील करात ५ रुपये आणि डिझेलवरील करात ३ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल ५ आणि डिझेल ३ रुपयांनी स्वस्त होणार आहे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलवरील करात दोन वेळा कपात केली होती. मात्र राज्यात सरकारवे पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट घटवला नव्हता. दरम्यान, राज्यात सत्तापरिवर्तन होऊन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर विधानसभेत विश्वासमत जिंकल्यानंतर सभागृहाला संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.