दि.४ (पीसीबी) – गेल्या पंधरा दिवसात झालेल्या पावसामुळे राज्यभरातील नद्या नाले तुडुंब भरले .अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली .शेतकऱ्यांची पीकं पाण्याखाली गेली . धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली .गेल्या वर्षी याच सुमारास 77.35% असणारा जलसाठा यंदा 86.20% एवढा झालाय. मराठवाडा विदर्भ, पुणे व कोकण विभागातील बहुतांश धरणं भरली आहेत. मराठवाड्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट जलसाठा झालाय. जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज राज्यभरातील लघु मध्यम व मोठ्या धरणांचा सरासरी उपयुक्त पाण्यासाठी 86.20 टक्क्यांवर गेलाय .
राज्यभरातील एकूण लघु मध्यम व मोठ्या अशा 2997 धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा 86.20% एवढा झालाय .धरणांमधील पाणीसाठ्यात कोकण विभागाने आघाडी घेतली आहे .मोठ्या मध्यम आणि लघु अशा सर्वच प्रकारच्या धरण प्रकल्पांचा विचार करता कोकण विभागातील धरणात 92.65% पुणे विभागात 91.74% नाशिक विभाग 80.46% छत्रपती संभाजी नगर मध्ये 81.36% अमरावती विभाग 85.02% तर नागपूर विभागात 78.81% पाणीसाठा झाला आहे .
मराठवाड्यातील धरणे फुल्ल !
मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण 98.61 टक्क्यांनी भरले आहे .गेल्या वर्षी जायकवाडीत याच सुमारास 47.64% पाणी साठा होता .बीडचे मांजरा धरण 98.94 टक्क्यांवर गेले आहे तर माजलगाव धरणात 94.72% पाणीसाठा आहे .गेल्यावर्षी या दोन्ही धरणांमध्ये 30.21% व 12.21% अनुक्रमे पाणीसाठा होता .हिंगोलीच्या सिद्धेश्वर आणि येलदरी धरणात 95% च्या पुढे पाणीसाठा झाला आहे .नांदेडच्या विष्णुपुरी धरणात 82.68% जलसाठा झाला असून निम्नमनार धरण 100 टक्क्यांनी भरले आहे . धाराशिव मधील निम्न तेरणा प्रकल्प 98.47% तर सीना कोळेगाव प्रकल्प 99.45% भरला आहे .परभणीतील निम्न दुधना प्रकल्प 73.35 टक्क्यांनी भरलाय . मराठवाड्यातील एकूण 44 धरण प्रकल्पांमध्ये 94.34% पाणीसाठा झालाय .हा पाणीसाठा गेल्यावर्षी 51.77% एवढा होता .
नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमध्ये 93.16% उपयुक्त पाणीसाठा झालाय . भंडारदरा निळवंडे धरण शंभर टक्के भरले आहे .नाशिकचे भाम धरण 100 टक्के भरले असून दारणा 97.60 गंगापूर 97.98% झाले आहे .पुण्यातील निरा देवघर, चाकसमान, भाटघर ,टेमघर, मुळशी टाटा, ठोकरवाडी टाटा ही धरणे 100% भरली असून पवना 87.89% तर खडकवासला 97.60% झाले आहे .पानशेत धरणात 99.96% पाणीसाठा झालाय .
कोल्हापुरातील राधानगरी प्रकल्प 99.25 टक्क्यांनी भरला आहे तर दूधगंगा धरणात 82.78% पाणी झालंय .सांगलीतील वारणा धरण 96.68 टक्क्यांनी भरले आहे तर साताऱ्यातील कोयना 98.49 टक्क्यांवर पोहोचले .सोलापुरातील उजनी धरण 100 टक्क्यांनी भरले आहे .