राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे; संजय राऊत महायुतीच्या कारभारावर कडाडले

0
100

मुंबई, दि. 14 (पीसीबी) : राज्यामध्ये रोज खून, दरोडे, बलात्कार होत आहेत, लूटमार सुरू आहे. आणि आज किंवा उद्या नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची निवडणूक निघणारे आहे. राजा उत्सवात मग्न आणि रस्त्यावर खून पडत आहेत. राज्याला गृहमंत्री नाही, आरोग्यमंत्री, शिक्षणमंत्री नाही, परिवहन मंत्री नाही, रस्त्यावर अपघात होत आहेत. हे कसलं राज्य आहे ? तुम्हाला तुमचे स्वत:चे मंत्री ठरवता येत नाहीत, भाजपला दिल्लीत जावं लागतंय, तिकडे एकनाथ शिंदेंच्या लोकांमध्ये त्यांचाचा ताळमेळ नाहीये. आणि दुसरीकडे अजित पवार स्वत: गडबडलेले आहेत. मला या राज्याची चिंता वाटते, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारच्या काराभारावर टीकास्त्र सोडलं.

बहुमत असलेलं सरकार जर राज्य चालवू शकत नसेल तर या राज्याचं काय होणार ? हळूहळू एकेक प्रकरण समोर येत जाईल. कोणाला मंत्री करणार, कोणाला वगळणार हा त्यांचा प्रश्न आहे. कोणालाही मंत्री केलं तरी या तीन पक्षाचेच लोक एकमेकांविरोधात फाईल्स आणून देणार आहेत, असा निशाणा त्यांनी साधला. तशा फाईल्स यायला सुरूवातही झाली आहे, असा दावा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला. या तीन तंगड्या एकमेकांमध्ये अडकून महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे. याच अधिवेशन काळात एखादा स्फोट होऊ शकतो असं मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, असंही राऊत म्हणाले.

या राज्याला आरोग्य खातंच नाहीये, आधी जे आरोग्यमंत्री होते ते भ्रष्टाचारीच होते. त्या राज्यात दुसरं काय घडू शकतं ? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. निकाल लागून एक महिना झाला तरी ते फक्त मंत्रीपदी कोण आणि मला कोणतं खातं मिळतंय, गृह की अर्थ, की महसूल ? यांत मग्न आहेत. स्वत:ला मलईदार खाती पाहिजेत, आणि डोळ्याची शस्त्रक्रिया झालेल्या ग्रामीण भागातील, मराठवाड्यातील महिला या थंडीत कुडकुडत तडफडत आहेत, असे म्हणत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांसह, अजित पवार, एकनाथ शिंदेवर जोरदार टीकास्त्र सोडलं.