दि.२९(पीसीबी)-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाला गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात मुखाग्नी देण्यात आला. अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले होते. आज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामती येथे हजारोंचा जनसागर लोटला होता. या सगळ्यांनी साश्रू नयनांनी अजित पवार यांचा अखेरचा निरोप दिला. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार या दोघांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवळयांनी एक मोठी मागणी केली आहे. अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी नरहरी झिरवळ यांनी केली आहे. नरहरी झिरवळ यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. तसेच ते बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर या सर्व जागा कोण भरुन काढणार, हा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला होता. आज अजित पवार यांच्या अंत्यविधीवेळी पार्थ पवार आणि जय पवार हे दोघे सर्व पाहुण्यांच्या भेटीगाठी घेत होते. अंत्यविधीच्या ठिकाणी हे दोघेच उभे होते. राष्ट्रवादीचे इतर नेते आणि इतर पवार कुटुंबीय खालीच बसून होते. त्यामुळे पार्थ पवार आणि अजित पवार हे दोघेच अजितदादांचे राजकीय वारसदार असतील, हे अधोरेखित झाले होते. यानंतर आता लगेचच नरहरी झिरवळ यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
पवार कुटुंबीय हे राजकारणात कायम प्रॅक्टिकल राहिले आहे. परिस्थितीची गरज आणि आगामी राजकारणाची दिशा ओळखून पावले उचलण्यात पवार कुटुंबीय वाकबगार आहेत. त्यामुळे एका बाजूला अजित पवार यांच्या जाण्याचे दु:ख असले तरी त्यांच्या माघारी निर्नायकी परिस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी आता हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे कोणाच्या हातात जाणार आणि उपमुख्यमंत्रीपदाबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.







































