सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत वैद्यकीय विभागाचे वर्चस्व कायम
पिंपरी, दि . ११ ( पीसीबी ) – आरोग्य मंत्रालयामार्फत राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या आरोग्य सेवांची वेळोवेळी तपासणी करून त्यांच्या कार्यप्रदर्शनाच्या आधारे रँकिंग जाहीर केली जाते. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या जुलै व ऑगस्ट २०२५ च्या आरोग्य कार्यक्रमांच्या रँकिंग (MoH Ranking) मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका प्रथम क्रमांक मिळवत सलग पाचव्यांदा राज्यात अव्वल स्थानी राहिली आहे.
राज्यातील एकूण २७ महानगरपालिकांना मागे टाकत जुलै महिन्यात ४४.८५ गुणांसह पिंपरी चिंचवड महापालिकेने पहिला क्रमांक पटकाविला तर ऑगस्ट ४३.०१ गुण मिळवून पुन्हा आपले प्रथम स्थान अबाधित ठेवले आहे.
या रँकिंगमध्ये मातृत्व आरोग्य, बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य, पीसीपीएनडीटी, आरसीएच पोर्टल, आयडीएसपी, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, रेबीज नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, डेंग्यू व मलेरिया नियंत्रण, असंसर्गजन्य आजार नियंत्रण, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मानांकन, ई-औषधी, मोफत निदान सेवा, आयुष्मान भारत-आरोग्य व आरोग्य कल्याण केंद्रे, एचआयव्हीएस, आशा कार्यक्रम तसेच प्रशासन व वित्तीय व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या निर्देशकांचा समावेश होता. या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राज्यातील इतर महानगरपालिकांवर आघाडी घेतली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या यशामुळे पुन्हा एकदा हे अधोरेखित झाले आहे की, सुयोग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळेच आरोग्यसेवेत उत्तम कामगिरी साधता येते.
“ही रँकिंग केवळ आकडेवारी नाही तर आपल्या कार्यसंस्कृतीची आणि आरोग्य सेवेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची पावती आहे. नागरिकाभिमुख धोरणे, सातत्यपूर्ण तपासणी, लसीकरण, महिलांचे व बालकांचे आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांवर नियंत्रण यामध्ये आम्ही सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे.” – विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
“वैद्यकीय विभागाने गेल्या काळात तब्बल पाच वेळा राज्यस्तरावर पहिला क्रमांक पटकावला आहे. आरोग्य सेवा पोहोचवताना प्रत्येक स्तरावर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांपासून रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांपर्यंत सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. ही राज्यस्तरीय कामगिरी शहरातील प्रत्येकासाठी अभिमानाची आहे. आगामी काळात आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपण ही कामगिरी टिकवून ठेवू असा आम्हाला विश्वास आहे.”- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका