राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या विधानावर दुपारी उध्दव ठाकरे यांची प्रेस

0
397

मुंबई, दि. ३० (पीसीबी) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबाबत केलेल्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. मुंबई आमचा प्राण आहे, त्याबाबात एकही अपशब्द ऐकून घेणार नाही, अशी भूमिका राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी घेतली आहे. यावरून शिवसेनाही आक्रमक झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. आज एक वाजता ही पत्रकार परिषद होणर आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केलं आहे. “राज्यपाल महोदयांच्या बेताल विधानाचा समाचार घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद-आज दुपारी मातोश्री येथे 1 वाजता”, असं ट्वि़ट राऊतांनी केलं आहे.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले?
आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या राज्यपालांनी या वेळेस थेट मुंबई बाबत एक मोठं विधान केला आहे. मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात, म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं थेट विधान केलं आहे. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असंही राज्यपाल म्हणाले आहेत.

कोश्यारींचा राजीनामा घ्यावा- राऊत
राष्ट्रवादी आणि मनसेने या विधानावरून राज्यपालांना खडेबोल सुनावले आहेत. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका करतानाच शिंदेगट आणि भाजपची कान उघाडणी केली आहे. राऊतांनी एकापाठोपाठ चार ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. राज्यात भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला आहे. थोडा जरी स्वाभिमान आणि अभिमान असेल तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घ्या. अथवा शिवसेनेचं नाव घेऊ नका, अशा शब्दात राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

राज्यपालांनी कुणाचाही अपमान केला नाही- राणे
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांचं समर्थन केलं आहे. मी त्या कार्यक्रमात होतो. राज्यपाल काहीच वावगं बोलले नाही. त्यांनी मुंबईच्या उत्कर्षात योगदान देणाऱ्या त्या त्या समाजाची आठवण करून दिली. राज्यपालांनी कुणाचा अपमान केला असता तर आम्ही बोललो असतो. त्यांनी त्या त्या समाजाच्या योगदानाचा उल्लेख केला आहे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला असं मला बिलकूल वाटत नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.