राज्यपालांची हकालपट्टी केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल

0
147

मुंबई, दि. १७ (पीसीबी) : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपाल टिंगलटवाळी करत आहेत. ही टिंगलटवाळी करताना राज्यपालांना शरम वाटली पाहिजे, असा संताप व्यक्त करतानाच अशा राज्यपालांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांची लवकर पदावरून हकालपट्टी करा. मी लोकशाही मार्गाने सांगतो. लोक शांत आहेत. राज्यपालांची हकालपट्टी केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा संतप्त इशाराच राष्ट्रवादीचे सर्वसेरवा शरद पवार यांनी केंद्र सरकारला आज दिला. ते महाविकास आघाडीच्या महामोर्चाला संबोधित करत होते.

शरद पवार यांनी आजच्या मोर्चाला संबोधित करताना थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील काही सन्मान चिन्हं आहेत. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे सन्मानीय स्थानं आहेत. त्यांच्याबद्दल काहीही बोलतात. राज्यात असा राज्यपाल पाहिला नाही. शंकरदयाळ शर्मांपासून अनेक राज्यपाल पाहिले. या राज्यपालांनी महाराष्ट्राचा नावलौकीक वाढवला. पण आजचे राज्यपाल महाराष्ट्राच्या विचारधारेला संकटात नेत आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

आजचे राज्यपाल सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्याबद्दल बाष्कळ विधान करतात. त्यांना शरम वाटली पाहिजे. महात्मा फुले यांनी आधुनिक विचार दिला. सामान्य माणूस, शेतकऱ्यांसाठी काम केलं. थोर नेते आणि समाजसुधारक म्हणून फुले यांचं नाव आहे, असं ते म्हणाले.

मी उत्तर भारत आणि दक्षिण भारतात जातो तिथं महात्मा फुले यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांनी ज्ञानदानाच्या क्षेत्रात मोठं काम केलं. त्यांच्याबाबत राज्यपालांकडून टिंगलटवाळी केली जात असेल तर राज्यपालांना पदावर राहण्याचा अधिकार नाही.

लोकशाहीच्या मार्गाने संदेश देतो, राज्यपालांची हकालपट्टी करा. आज लोक शांत आहेत. तुम्ही हकालपट्टी केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवया राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

राज्यपालांना हटवलं नाही तर आगामी काळात आम्ही एकत्र बसू आणि काय कार्यक्रम करायचा हे ठरवू, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. तसेच राज्यातील जनता आता शांत बसणार नाही. हा इशारा आहे. त्यातून बोध घेतला नाही तर लोकशाही मार्गातून काय धडा शिकवायचा तो शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

हा मोर्चा एका वेगळ्या स्थितीचं दर्शन घडवत आहे हे उद्धव ठाकरे यांनी आताच सांगितलं. ते खरं आहे. मला आठवतंय, 70 वर्षापूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर या मुंबई नगरीत लाखोंचे मोर्चे निघाले. मराठी भाषिकांचं राज्य व्हावं यासाठी हौतात्म्य पत्करायला अनेक तरुण पुढे आले . घरादाराचा विचार केला नाही. महाराष्ट्राचा विचार केला. शेवटी महाराष्ट्र पदरात पडला, असं त्यांनी सांगितलं.

अजूनही मराठी भाषिक महाराष्ट्राबाहेर आहे. ते महाराष्ट्रात येण्याचा आग्रह धरत आहेत. बेळगाव, निपाणीसह अन्य गावातील लोक महाराष्ट्रात येण्यास उत्सुक आहेत. त्यांची भावना आहे. त्याच्याशी मराठी माणूस अंत:करणापासून सहभागी आहे, असं ते म्हणाले.

आज ही गर्दी राज्याच्या कानाकोपऱ्यातून एकत्र का आली? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान. आज महाराष्ट्राचा सन्मानावर हल्ला होत आहे. आज जे सत्तेत आहे. राज्याची सूत्रे ज्यांच्या हातात आहे तेच लोक महाराष्ट्रातील युगपुरुषांबद्दल वेगळी भाषा वापरत आहे. या देशात अनेक राजेराजवाडे होऊन गेले. अनेकांची संस्थाने झाली.