राजेश पाटलांची बदली होताच मर्जीतील विकास ढाकणेंसह जवळच्या अधिकाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता

0
456

पिंपरी दि.२० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदावरुन राजेश पाटील यांची उचलबांगडी होताच त्यांचे अतिशय निकटवर्तीय अतिरिक्त विकास ढाकणे यांच्यासह जवळच्या अधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. त्यांचे बोलण्यातून ते दिसून येत आहेत. ढाकणे यांच्या चेह-यावर तर प्रचंड नाराजी दिसत आहे. आपल्याकडील मलईदार विभाग नवीन आयुक्त कायम ठेवतील की नाही? अशी धास्ती या अधिका-यांना वाटत आहे. त्यामुळे पाटलांच्या मर्जीतील अधिका-यांना आता बिस्तारा गुंडाळून बदलीसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याचे समजते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची राज्य सरकारने 16 ऑगस्ट रोजी तडकाफडकी बदली केली. पाटील यांना आयुक्त म्हणून अवघा दीड वर्षांचा कार्यकाळ मिळाला. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. सिंह यांनी गुरूवार (दि.18) रोजी आयुक्त आणि प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला. पाटील यांची महापालिकेत आणखी काम करण्याची इच्छा होती, असे स्वतः त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. पाटील आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी शहरातील राजकीय पुढाऱ्यांमार्फत बदलीला स्थगिती मिळविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केली. स्थगिती नाही तर निदान पुण्यातच पोस्टिंग देण्याची मागणी केली.

राजेश पाटील आयुक्त होते. खरे पण अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे हेच सर्व कारभार पाहत होते. आयुक्तांकडे कोणतेही काम घेऊन गेले की ते ढाकणे यांच्याकडे पाठवत असे. त्यामुळे आयुक्त पाटील आहेत की ढाकणे असा प्रश्न पडत होता. आयुक्तांना एवढा अंध विश्वास टाकल्यानंतर ढाकणे यांची गाडी सुसाट सुरु झाली. राज्य सेवेतील आणि त्यातली त्यात ‘अॅग्री’लो सोबत असलेल्यांचा एक ग्रुप केला. मर्जीतील या उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांना महत्वाचे विभाग दिले होते. मलईदार विभागाचा कारभार सोपविला. भांडार विभाग सोडता स्थानिक अधिकाऱ्यांना कमी महत्वाचे विभाग सोपविले होते. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये पाटील यांच्याबाबत कमालीची नाराजी पसरली होती.

दुसरीकडे शासनाच्या अधिकाऱ्यांचा दिवसेंदिवस महापालिकेतील रूबाब वाढला होता. स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये काही बोटावर मोजण्याइतके अधिकारी पाटील यांनी जवळ केले होते. आता पाटील यांची राज्य सरकारने तडकाफडकी बदली केल्यानंतर त्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांमध्ये कमालाची अस्वस्थता पसरली आहे. तसेच काही अधिकारी स्वतःहून बदली करून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिकेतील शासनाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्‍यता आहे. नववियुक्त आयुक्त शेखर सिंह हे पालिकेतील विविध विभागाच्या प्रमुखांच्या बदल्या करतात की त्यांनाच कायम ठेवतात हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.