जयपूर, दि. २९ (पीसीबी) : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर मतदानाची प्रक्रिया नुकतीच पार पडली. आता निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र, आता निवडणुकीदरम्यान पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला का? अशा चर्चांना उधाण आले आहे. कारण राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून ६९२ कोटी रुपयांची अवैध रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच दारू आणि मतदारांना वाटण्यासाठी आणलेले इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. यामुळे निवडणुकीत पैशाचा महापूर आला होता का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
राजस्थान राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, “राजस्थानमध्ये 690 कोटी रुपयांची रोकड, दारू, ड्रग्ज आणि मतदारांना वाटण्याच्या इतर काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व गोष्टींचा वापर मतदारांना आकर्षित करण्यासाठी केला जाणार होता. निवडणुकीत धनशक्तीचा गैरवापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने हे काम केले. मात्र, निवडणुकीदरम्यान आणखी पैशांचा वापर झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.