राजस्थानी बांधवांच्या गेर नृत्यावरधरला खासदार बारणे यांनी ठेका

0
135
  • पुण्याहून जोधपूर व जयपूरसाठी दररोज रेल्वे गाडीसाठी प्रयत्न करणार – बारणे
  • अखिल राजस्थानी समाजाचा खासदार बारणे यांना पाठिंबा

थेरगाव, दि. 5 एप्रिल – राजस्थानी बांधवांनी दिमाखदार पद्धतीने पारंपरिक गेर नृत्य सादर करीत खासदार श्रीरंग बारणे यांना नुकत्याच झालेल्या होळीसाठी व लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. राजस्थानी बांधवांच्या गेर नृत्यावर ठेका धरीत बारणे यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांना समाजाच्या विविध घटकांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे. पिंपरी चिंचवड अखिल राजस्थानी समाजाच्या वतीने थेरगाव येथे खासदार बारणे यांच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर होळीनिमित्त पारंपरिक गेर नृत्य सादर केले. ढोलाच्या ठेक्यावर पायात घुंगरू आणि हातात सुंदर रंगीत छत्र्या घेऊन राजस्थानी कलाकारांनी सादर केलेल्या या नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. ढोलाच्या तालावर गेर नृत्यात काही काळ सहभागी होत बारणे यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळीअखिल भारतीय सिरवी महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष चंदुलाल चौधरी, महाराष्ट्र प्रदेश सोनार समाजाचे प्रदेश व पुणे जिल्हा अधक्ष हरीश वर्मा, ताथवडे वाघजाई मंदिर येथील शिवशक्ती आश्रमाचे महंत तुलसीगिरी महाराज, महाराष्ट्र भाजपचे निमंत्रित सदस्य उमेश चौधरी, पुणे जिल्हा जांगीड (सुथार) समाजाचे कोषाध्यक्ष बिरदीचंद जांगीड, पिंपरी चिंचवड सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप सोनिगरा, मिलिंद सोनिगरा तसेच शहरातील राजस्थानी बांधव उपस्थित होते.

खासदार बारणे यांनी संपूर्ण मतदारसंघातील राजस्थानी बांधवांना सातत्याने साथ दिली आहे. अडीअडचणी सोडवल्या आहेत. त्यामुळे मतदारसंघातील दीड लाख राजस्थानी बांधवांचा या निवडणुकीतही बारणे यांनाच पाठिंबा राहील, असे हरीश वर्मा यांनी जाहीर केले.

पुणे-जोधपूर व पुणे- जयपूर या रेल्वे गाड्या सुरू केल्याबद्दल राजस्थानी बांधवांनी बारणे यांना धन्यवाद दिले. या गाड्या दररोज सोडण्यात याव्यात तसेच या गाड्यांना चिंचवड येथे थांबा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली. खासदार बारणे हे या निवडणुकीत केवळ हॅटट्रिकच पूर्ण करणार नाहीत तर त्यांना केंद्रात मंत्रिपदही मिळेल, असा विश्वास राजस्थानी बांधवांनी व्यक्त केला.

खासदार बारणे यांनी अखिल राजस्थानी समाजाचे आभार मानले. मतदारसंघातील राजस्थानी बांधव पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपल्याशी गेली अनेक वर्षे जोडला गेलेला आहे. राजस्थानी बांधवांनी त्यांच्या दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला महायुतीलाच मतदान करण्यास सांगून प्रचारात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन बारणे यांनी केले. निवडणुकीनंतर राजस्थानी बांधवांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देखील बारणे यांनी दिले.

‘अब की बार, चार सौ पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’, ‘आप्पा बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.