राजस्थानात काँग्रेस, भाजपची मोठी कोंडी, तब्बल १८७५ बंडखोर उमेदवार रिंगणात

0
242

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) : राजस्थानमध्ये गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांमध्ये अनेक बंडखोरांनी उमेदवारी कायम राखल्याने या दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. राजस्थानमध्ये २०० मतदारसंघात १८७५ उमेदवार रिंगणात उरले आहेत. भाजप व काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरी झाली होती. पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार अनेकांनी अर्ज मागे घेतले तरी दोन्ही पक्षात २० ते २२ उमेदवारांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. यामुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना या बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दूरध्वनी केल्यानंतर भाजपच्या काहींनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यात झोटावाड या मतदारसंघातून राजपाल सिंग शेखावत यांचा समावेश आहे. या मतदारसंघातून भाजपचे खासदार राज्यवर्धन राठोड रिंगणात आहे. परंतु वसुंधराराजे यांचे समर्थक मानले जाणारे युनूस खान यांनी डिडवाना येथून उमेदवारी कायम राखली आहे. युनूस खान हे वसुंधरा राजे मंत्रिमंडळात मंत्री होते.

याशिवाय चितोडगडमधून चंद्रभान आयवा, बाडनेरमधून प्रियांका चौधरी, शिवमधून रविंद्र भाटी, सूरतगडमधून राजेंद्र भादू, सुजानगडमधून राजेंद्र नायक, सीकरमधून ताराचंद धायल, शहापुरातून कैलाश मेघवाल, खासदार किरोडीलाल मीणा निवडणूक लढत असलेल्या सवाई माधोपूरमधून आशा मीणा यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्याचप्रमाणे लाडपुरातून भवानी सिंह राजावत यांची बंडखोरी भाजपला महाग पडू शकते. त्याचप्रमाणे काँग्रेसमध्येही बंडखोरीची लागण झाली असून अनेकांनी अपक्ष म्हणून नशीब अजमाविण्याची निश्चय केला आहे.

यात प्रामुख्याने पुष्कर मतदारसंघातून गोपाल बाहेती, राजगडमधून जौहरीलाल मीणा, मुंडावरमधून अंजली यादव, सरदारशहर मतदारसंघातून राजकर्ण चौधरी, शाहपुरातून आलोक बेनीवाल, लक्ष्मणगडमधून जौहरीलाल मीणा व बरोडीतून खिलाडीलाल बैरंवा यांची उमेदवारी काँग्रेसला अडचणीची ठरू शकते. बसपच्या ९ व समाजवादी पक्षाच्या ४ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. अन्यथा या पक्षांचे उमेदवारांमुळे काँग्रेसचे मतदान कमी करण्याची शक्यता होती.