“राजकीय स्वार्थ हा सामाजिक न्यायातील अडथळा!” छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला – अंतिम पुष्प

0
237

पिंपरी, दि. ०६ (पीसीबी) – “विरोधकांचा राजकीय स्वार्थ हा सामाजिक न्यायातील अडथळा आहे!” असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. गुरू प्रकाश पासवान यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ प्रांगण, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक ०५ मे २०२३ रोजी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित पाच दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेत ‘सामाजिक न्याय की भारतीय अवधारणा’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना डॉ. गुरू प्रकाश पासवान बोलत होते. उद्योजक आशुतोष खंडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. गुरू प्रकाश पासवान पुढे म्हणाले की, “आमच्या संस्कृतीत असलेल्या ‘चरैवेती… चरैवेती…’ या तत्त्वानुसार समाजातील सर्वच घटकांना सोबत घेऊन आमची वाटचाल सुरू आहे; परंतु सामाजिक न्यायासंदर्भात अनेक भ्रम निर्माण केले जातात. शोषणमुक्त अन् समतायुक्त समाज निर्माण करण्यासाठी भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेण्यात येतात. भारतीय संविधानातील सर्वोच्च स्थानावर आदिवासी महिलेची निवड करण्यात येऊनही विरोधकांनी केलेली टीका अनाकलनीय आहे. स्वातंत्र्यप्राप्तीचे सर्व श्रेय फक्त एकाच परिवाराला देणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या उक्ती अन् कृतीत महद् अंतर आहे. १९५२ पासून राज्यसभेवर दलितांना पुरेसे प्रतिनिधित्व दिले जात नव्हते. पद्म पुरस्कारांची खैरात राजकीय खुशामत करणाऱ्या अन् उच्चभ्रू वर्तुळातल्या लब्धप्रतिष्ठितांना केली जात होती; परंतु या सात-आठ वर्षांपासून ती परिस्थिती बदलली आहे.

बाबू जगजीवनराम, बाबासाहेब आंबेडकर या नेत्यांना फक्त दलितांचे अन् वंचितांचे नेते म्हणून सीमित करण्यात येते. आत्ता तर जातीनिहाय जनगणना करण्याचा दुराग्रह करण्यात येतो आहे. राजीव गांधी यांनी मंडल आयोगाला विरोध केला होता; तर शंभर वर्षांच्या इतिहासात डाव्यांनी पहिल्यांदा दलित व्यक्तीला उच्च स्थानावर नियुक्त केले आहे.‌ कलम ३७० हटवायला आणि सीएए कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी होणारा विरोधही राजकीय स्वार्थापोटी आहे.‌ लोकशाहीत वैचारिक विरोधाचे स्वागत आहे; परंतु कोणत्याही गोष्टीचा विरोध करताना राष्ट्रहित सर्वोच्च स्थानी असले पाहिजे. भाजपा हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे; आणि या पक्षाचा प्रवक्ता एक दलित तरुण आहे यापेक्षा सामाजिक न्यायाचे उत्तम उदाहरण कोणते असू शकते?”
आपल्या व्याख्यानाचा समारोप डॉ. गुरू प्रकाश पासवान यांनी ‘भारतमाता की जय!’ या घोषणेने केला.

राजेंद्र देशपांडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. व्याख्यानमाला प्रमुख शिवानंद चौगुले, सहप्रमुख विकास देशपांडे आणि अन्य सदस्यांनी व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सागर पाटील यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. संपदा रानडे यांनी सादर केलेल्या पसायदानाने व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली