मुंबई, दि. 16 (पीसीबी) : महाराष्ट्राच्या राजकारणात आता ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर यांनी थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर हे राज्यातील विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवण्यावर ठाम आहेत. ते प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहेत. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची जास्त शक्यता आहे. महादेव जानकर गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरु होती. महायुतीच्या जागावाटपात आपल्याला विचारलं जात नाही, अशी महादेव जानकर यांची खंत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीच्या जागावाटपात आपल्याला विचारात घेतलं जात नसल्यामुळे महादेव जानकर यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
महादेव जानकर यांना धनगर समाजाचा मोठा पाठिंबा आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये महादेव जानकर यांच्या पक्षाची ताकद आहे. महादेव जानकर यांची सोलापूर, बारामती, मराठवाड्यातील काही भाग, परभणी, बीड, जालना आणि कर्नाटक लगतच्या प्रदेशात मोठी ताकद आहे. जिथे धनगर समाजाची संख्या जास्त आहे तिथे महादेव जानकर यांच्या पक्षाला चांगला पाठिंबा आहे. त्यामुळे जानकर यांनी महायुतीला सोडचिठ्ठी देणं हे महायुतीला डोकेदुखी ठरु शकतं. त्यामुळे जातीय समीकरणांचा विचार करता भाजपला महादेव जानकर यांची मनधरणी करण्यात यश येतं का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
“काहीही नाही. मी कुणावर नाराज नाही. राष्ट्रीय समाज पक्ष देखील देशात मोठा पक्ष झाला पाहिजे. काँग्रेस आणि भाजपच्या लायकीत आला पाहिजे त्यासाठी आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. आमची ताकद किती आहे, ते पाहण्यासाठी आम्ही लढणार आहोत. आम्ही सर्व 288 जागांवर लढणार आहोत”, अशी प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी दिली. “महायुती बरोबर होतो, आता महायुती बरोबर नाही. त्यांच्याबरोबर होतो तेव्हा त्यांनी लोकसभेला एक जागा दिली. अभिनंदन. आता आम्हाला आमची ताकद बघायची आहे. आमच्या पक्षाला मान्यता मिळवण्यासाठी कमीत कमी 12 आमदार किंवा 2 खासदार निवडून आणणं आवश्यक आहे. निवडणूक आयोगाच्या अटी पूर्ण करण्यासाठी आम्हाला आमचे दहा ते पंधरा आमदार निवडून आणले पाहिजेत. त्यामुळे आमच्या पार्लमेंट्री बोर्डाने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर झारखंड विधानसभा निवडणुकीतही आमचा पक्ष निवडणूक लढवणार आहे”, असं महादेव जानकर म्हणाले.