मुंबई, दि. 25 (पीसीबी) : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांचे नेते जोरदार कामाला लागले आहेत. यातच अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. आज भारतीय जनता पक्षाचे नेते तथा सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
माजी खासदार संजय काका पाटील हे तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात माजी खासदार संजय काका पाटील आणि रोहित पाटील यांच्यात लढत होणार आहे. सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून संजय काका पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर या चर्चांवर आता पडदा पडला आहे. त्यामुळे आता तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभेच्या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.
माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर काही वेळातच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता तासगाव -कवठेमहांकाळमध्ये संजय काका पाटील आणि रोहित पाटील यांच्यात लढत होणार आहे.












































