पिंपरी, दि. १७ ऑगस्ट (पीसीबी) – : महिलांच्या चेहऱ्यावर हसू, आनंद दिसत असल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्पुरती असल्याचे विरोधक सांगत आहेत. महायुतीचे सहकारीही उत्साहाच्या भरात पैसे परत घेणार असे सांगत आहेत. परंतु, हे पैसे भाऊबीज म्हणून दिले आहेत. हे पैसे परत घेतले जाणार नाहीत हे मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने मी सांगतो अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राजकीय आयुष्यातील आजचा दिवस सर्वात आनंदाचा दिवस असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ बालेवाडीत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, मेधा कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, की महिला सक्षम, सबळ झाल्या पाहिजेत यासाठी ही योजना आणली. कारण नसताना विरोधक टीका-टिप्पणी करत आहेत. भावांकडे लक्ष नाही असे म्हणत आहेत. शेतक-यांच्या मोटारीला वीज माफी दिली आहे. दुधाला एक लीटरला पाच रुपये अधिकचे अनुदान दिले आहे. सर्वसामान्य जनेतेचे सरकार आहे. विरोधकांनी अगोदर विरोध केला. न्यायालयात गेले, तिथे टिकले नाही. महिलांच्या चेह-यावर हसू, आनंद दिसत आहे. त्यामुळे ही योजना तात्पुरती असल्याचे सांगितले जात आहे. योजनेचे सातत्य टिकविणे महिलांच्या हातात आहे. महायुतीला पाठबळ द्यावे. पाच वर्षात नव्वद हजार रुपये दिले जातील. आता टीका बंद केली. त्याकडे दुर्लक्ष करावे. लोकसभेला राज्यघटना बदलणार असे सांगितले. आता त्यांच्या कथानकाला बळी पडू नका, महायुतीचे सहकारीही उत्साहाच्या भरात पैसे परत घेणार असे सांगत आहेत. परंतु, हे पैसे भाऊबीज म्हणून दिले आहेत. हे मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो की पैसे परत घेतले जाणार नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका, आत्तापर्यंत एक कोटी तीन लाख महिलांना पैसे मिळाले आहेत. राजकीय आयुष्यातील आजचा दिवस सर्वात आनंदाचा दिवस आहे.
अडीच कोटी महिलांपर्यंत योजना पोहचविणार
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, की मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री या लाडक्या भावांनी रक्षाबंधनाच्या आदल्यादिवशीच महिलांना ओवाळणी दिली. यानंतरही महिलांची नोंदणी केली जाणार आहे. अडीच कोटी महिलांपर्यंत ही योजना पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.
विरोधकांना कावीळ – डॉ. गोऱ्हे
आजची कार्यक्रम पत्रिका अतिशय आगळी-वेगळी आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वांचे आईसह पत्रिकेत नाव घातले आहे. लाडकी बहिण योजनाच का, महिलांना एवढे पैसे कशासाठी, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. विरोधकांना पोट, डोकेदुखी, कावीळ झाली आहे. त्यामुळे योजनेला विरोध करत आहेत. जगात महिलांच्या नावावर केवळ एक टक्का मालमत्ता आहे. महिलांची वृद्धी केली तर विरोधकांच्या पोटात दुखण्याचे काय कारण आहे, असा सवाल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला.