नागपूर, दि. 08 (पीसीबी): केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रोकठोक बोलतात. अनेक विषयांवर त्यांचे थेट बोलणे व्यवस्थेच्या चिंधड्या उडवतात. तर काही वेळा त्यांचा वऱ्हाडी ठेचा झोंबतो. कधी कधी चिमटे हस्याची खसखस पिकवतात. पण एकूणच गडकरी बोलले की राजकारण्यांसह अभ्यासकांचे कान टवकारतात. आता त्यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले आहे. त्यांनी राजकारण्यांचे अनेक कान धरले आहे. तर त्याचवेळी चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना फटकारे सुद्धा लगावले आहेत. काम केल्यानंतर कोणालाच कळल नाही पाहिजे, पण आजकाल 10 रुपये देऊन चौकात 10 फोटो लावणारे आहे असे म्हणत टोला हाणला.
राजकारणी जसे बोलतो तसे करत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे. लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे अस वाटतं. काही तर समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे असेही म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक राजकारण्यांचे कान टोचले.ते नागपुरातील सुरेश भट सभागृहात अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते
लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचार बोललो, जातपात पाळत नाही. मला वोट द्या किंवा नका देऊ. जो म्हणणार जात त्याला बसणार लात असंही बोललो. चक्रधर स्वामी यांनी हाच संदेश दिला. समाजात अज्ञान अंधश्रद्धा, असमानता, स्त्री पुरुष विषमता हा भेद संपला पाहिजे. हाच संदेश घेऊन आपण जनतेच प्रबोधन केलं पाहिजे, असे नितीन गडकरी म्हणाले.
पैसा हे साधन आहे पण साध्य नाहीये. माझा निवडणुकीमध्ये कोणीतरी गाणे तयार केले. ते गाणे युट्युब वर टाकले. ते गाणे 90 लाख लोकांनी ऐकले. त्या गाण्यापोटी रॉयल्टी म्हणून 85 हजार रुपये मला आणून दिले. चांगलं काम करा, आशीर्वाद पाठीशी आहे. काम केल्यानंतर कोणालाच कळल नाही पाहिजे, पण आजकाल 10 रुपये देऊन चौकात 10 फोटो लावणारे आहे असे म्हणत टोला हाणला.












































