राक्षसी महत्त्वकांक्षा + प्रशासनाचा पूर्ण ऱ्हास = महाराष्ट्राचे नुकसान, आदित्य ठाकरे म्हणतात…

0
239

मुंबई,दि.३०(पीसीबी) – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘सॅफ्रन’ प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा खोके सरकारवरुन विश्वास उडाला आहे. त्यामध्ये उद्योग आणि कृषी क्षेत्राचा समावेश असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे एकापाठोपाठ एक प्रकल्प राज्याबाहेर जात असल्यानं मुंबईच्या लालबाग परिसरात ठाकरे गटाकडून बॅनर लावत शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे. या बॅनरवर आतापर्यंत महाराष्ट्राबाहेर गेलेल्या सर्व प्रकल्पांची नावं लिहिण्यात आली आहेत. तसंच मुंबईसह महाराष्ट्राची तरुणाई विचारतेय यासाठीच बदल हवाय का? असा सवालही या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं?
‘सॅफ्रन’ प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हे ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारला जोरदार टोला लगावला आहे. ‘दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा खोके सरकारवरुन विश्वास उडाला आहे, उद्योग आणि कृषी… गुंतवणूकदारांचा राजकीय स्थौर्यावरील विश्वास उडाला आहे. तर हवामान संकटावेळी शेतकऱ्यांचा सरकारच्या पाठिंब्यावरचा विश्वास उडाला आहे. राक्षसी महत्त्वकांक्षा + प्रशासनाचा पूर्ण ऱ्हास = महाराष्ट्राचे नुकसान’ असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान दुसरीकडे आज ठाकरे गटाकडून मुंबईच्या लालबाग परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पावरून शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. या बॅनवर आतापर्यंत राज्याच्याबाहेर गेलेल्या प्रकल्पाांची यादी देण्यात आली आहे. तसेच मुंबईसह महाराष्ट्राची तरुणाई विचारतेय यासाठीच बदल हवाय का? असा सवालही विचारण्यात आला आहे.