मुंबई, दि. 06 (पीसीबी) : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतला यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी जोरदार टीका केलीय. संजय राऊतांना जर आता आवरलं नाही तर उरले सुरलेले उद्धव ठाकरे गटातील आमदारांचंही काही खरं नाही असं सूचक वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलं आहे. ठाकरे गटाचे आमदार खासगीत राऊतांबाबत काय बोलतात? ते आम्हाला सांगतात. माझांही त्या आमदारांना आवाहन आहे. राऊतांपासून सावध रहा. एसटीच्या मागे जसं लिहिलं असतं सुरक्षित अंतर ठेवा, तर उबाठाच्या आमदारांनी राऊतांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, अन्यथा त्याचं भविष्यही फार चांगलं नाही असेही देसाई म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या पोटात एक आणि ओठात एक कधीच नसतं
2019 मध्ये सत्तास्थापनेवेळी उद्धव ठाकरे आमदारांकडे बोट दाखवून म्हणाले होते मला तुमच्यातला मुख्यमंत्री करायचा आहे. मात्र कालांतराने त्यांचे ते बोट स्वत:कडे कसं वळलं? मग खूर्चीचा मोह कोणाला आहे ते ओळखावं असा टोलाही शंभूराज देसाई यांन लगावला. उपमुख्यमंत्री नाराज आहेत हे तुम्ही त्याना त्यांचा बॉडी लॅगवेजवरून ओळखू शकत नाही. शिंदेंच्या पोटात एक आणि ओठात एक कधीच नसतं. युतीत अजित दादा सहभागी झाल्याने थोडी रस्सीखेच पहायला मिळाली होती. मात्र आता तिघांमध्ये समन्वय आहे. योग्य तो मान पान आणि खेळीमेळीच्या वातावरणात मंत्रीमंडळ वाटप होईल, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना मोठा दावा केला. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावीच लागणार होती. त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती. माझ्याकडे पक्की माहिती आहे, मी महितीशिवाय बोलत नाही. सरकारमध्ये आमची माणसं आहेत. आमचे हितचिंतक असतात. त्यांच्या पक्षातसुद्धा आमचे हितचिंतक आहेत. दाबदबावाचा अडेलतट्टूपणा असाच कायम राहिला असता, तर त्यांच्याशिवाय पुढे जा, असे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने कळवलं होतं, असा दावा संजय राऊत यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार हे स्पष्ट झाले होते. यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर बोलताना राऊतांनी हे वक्तव्य केलं होतं.