रांगोळी घराला सौंदर्याचा आणि मंगलमयतेचा स्पर्श देणारी कला : राहुल कलाटे

0
19

: भव्य रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

वाकड, ता. ८ : भारतीय सण-संस्कृतीत रांगोळी काढण्याची परंपरा ही घराच्या उंबरठ्याला सौंदर्याचा आणि मंगलमयतेचा स्पर्श देणारी कला आहे. ही निर्जीव रांगोळी सजीव भासवण्याची हातोटी ही प्रत्येक कलाकाराची जिद्द आणि सर्जनशीलता व्यक्त करणारी असल्याचे मत माजी नगरसेवक तथा आयोजक राहुल कलाटे यांनी व्यक्त केले.
दीपावली सणानिमित्त राहुल कलाटे आयोजित ‘भव्य रांगोळी स्पर्धेचा’ भव्य बक्षीस वितरण सोहळा पार पडला यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी श्री राधाचैतन्य गोशाळेच्या सचिव भागवताचार्य हभप. अंजलीताई महाराज गुरव तसेच सामाजिक कार्यकर्ते किरण वडगामा यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील रांगोळी प्रेमी महिला भगिनींना प्रोत्साहन मिळावे म्हणून मागील सात वर्षांपासून ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जाते. यंदाही शहरातील महिलांचा उस्फुर्त सहभाग लाभला.
विजेत्या महिला स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गायत्री बिरारी, चार्मी ठक्कर आणि मृण्मयी मंगेशकर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून कामकाज पाहिले. यावेळी कलाटे परिवारातील महिला मंडळ तसेच वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील माता-भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. आनंद, उत्साह आणि कौतुकाच्या वातावरणात सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

स्पर्धेतील विजेते
प्रथम: कोमल पाटील, द्वितीय: निकिता कोकिटकर, तृतीय: माधुरी पांडे यांनी पटकावला. तसेच उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी माधवी साबदे, सुजाता कोठारी, श्रावणी शिंदे, दीप्ती लोंढे आणि तेजल काळे यांची निवड करण्यात आली.