दि.८(पीसीबी) – रहाटणी येथील नखाते पेट्रोल पंपाजवळ माजी नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते आणि शुभम नखाते युवा मंच यांच्या वतीने गणेश विसर्जनासाठी कृत्रिम हौदाची व्यवस्था करण्यात आली होती. गणेशोत्सवातील पाचवा, सातवा, नव्वा ,दहावा आणि अनंत चतुर्थी दिवशी घरगुती तसेच मंडळांच्या गणपतींचे विसर्जन या ठिकाणी पार पडले.
या हौदात विधीवत पूजा, मंत्रोच्चार आणि आरती करून गणरायाचे विसर्जन करण्यात आले. रहाटणी व काळेवाडी परिसरातील गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने येथे सहभाग घेतला. विसर्जन प्रक्रियेत एकूण ३,९९६ गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या. त्यापैकी घरगुती गणपतींसोबत काही मंडळांच्या मूर्तींचाही समावेश होता. पर्यावरणपूरकतेचा आदर्श ठेवत यावेळी निर्माल्य, प्लास्टिक आणि पूजेचे इतर साहित्य स्वतंत्रपणे संकलित करण्यात आले. संकलित साहित्य महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पुढील व्यवस्थापनासाठी सुपूर्द करण्यात आले.
या विसर्जन सोहळ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे भक्तांसाठी लाडक्या बाप्पांसोबत फोटो काढून फोटो फ्रेम देण्यात आल्या . भक्तिभाव आणि सांस्कृतिक वातावरणात झालेल्या या विसर्जन सोहळ्याला रहाटणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गणरायाच्या विसर्जनाचा हा सोहळा केवळ धार्मिक विधी नव्हता, तर श्रद्धा, संस्कार आणि पर्यावरणपूरकतेचा संगम होता. भक्तांनी विधीवत पूजा, आरती आणि मंत्रोच्चारांद्वारे बाप्पाला निरोप देताना निर्माल्य व प्लास्टिक वेगळे संकलित करून पर्यावरण जपण्याचा संदेश दिला,असे रहाटणी-काळेवाडीचे माजी नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते यांनी सांगितले .












































