परस्पर विरोधात गुन्हे दाखल
हिंजवडी, दि. 02 (पीसीबी) : रस्त्यात एकमेकांची वाहने अडवून शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी परस्परविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 1) सायंकाळी पारखेवस्ती, वाकड येथे घडली.
36 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रशांत भुजबळ, मयूर भुजबळ आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला आणि त्यांचे पती कार मधून घरी जात असताना पारखेवस्ती वाकड येथे आल्यानंतर आरोपींनी त्यांची गाडी समोर उभी करून पुढे जाण्यास अटकाव केला. त्यामुळे फिर्यादी आणि त्यांचे पती कार मधून उतरून घराकडे जात असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून संपवून टाकतो अशी धमकी दिली. गाडीतील सामान घेण्यासाठी फिर्यादी महिला गाडीजवळ गेल्या असता आरोपी त्यांच्या अंगावर धावून येत 50 ते 60 लाख रुपये गेले तरी चालतील. तुझी भाड्याची लोकं घेऊन ये त्यांनाही संपवून टाकतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याच्या परस्पर विरोधात प्रशांत भुजबळ यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मंगेश सायकर आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत भुजबळ त्यांच्या दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांची कार रस्त्यात थांबवून प्रशांत यांना पुढे जाण्यास प्रतिबंध केला. दुचाकी तिथेच थांबवून घराकडे जात असताना आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.