रसिकांना मंत्रमुग्ध करणारी महापालिकेची संगीतमय दिवाळी पहाट

0
237

पिंपरी, दि. २२ ( पीसीबी) – ख्यातनाम शास्त्रीय गायिका गौरी पाठारे यांच्या स्वरांची उधळण, सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित रोनु मुजुमदार यांचे बहारदार बासरी वादन आणि पंडीत जयतीर्थ मेऊंडी यांच्या रसिकांच्या मनाचा ठाव घेणा-या शास्त्रीय व भक्तीगीत गायनातुन ताल सूरांनी सजलेल्या तेजोमय प्रकाशात रसिकांना मंत्रमुग्ध करीत आज आनंदात संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दिपावलीचे औचित्य साधुन दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, आमदार उमा खापरे, आयुक्त शेखर सिंह, पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उप आयुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, माजी अतिरिक्त आयुक्त प्रविण तुपे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने होते.

गौरी पाठारे यांनी राग जौनपुरी मध्ये बडा ख्याल, मध्यलय त्रिताल मध्ये बंदिश, निर्गुणी भजन सादर केले.
‘अबीर गुलाल उधळीत रंग’ या भजनगीताला रसिकांनी दिलेली उत्स्फूर्त दाद यामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. सुप्रिया मोडक यांनी हार्मोनियमवर, पुष्कराज जोशी यांनी तबल्यावर, गायत्री गोखले यांनी तानपुऱ्यावर तर अनुजा बोराडे यांनी पखवाजावर गौरी पाठारे यांच्या गीत गायनाला साथ दिली.
मंगल भैरव रागाने पंडित रोनु मुजुमदार यांनी बासरी वादनाला सुरुवात केली. यानंतर विविध बंदिशी पेश करीत त्यांनी रसिकांच्या मनाला साद घातली. झपताल तीनताल, विभास राग, आलिया बिलावल आणि मेघ रागात पेश केलेल्या बंदीशीला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. पहाडी रागाने बासरी वादनाची सांगता झाली. हर्षद कानिटकर यांनी तबल्यावर तर कल्पेश साचला यांनी बासरीवर साथसंगत दिली.

पंडित जयतीर्थ मेऊंडी यांनी शास्त्रीय गीत गायनामध्ये अनेक बंदीशी पेश केल्या. ‘शुभ दिपावली प्रभात दीप जलाव छायो आनंद सकल जगत मे’ या गीतातून त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग, शेवटचा दिस गोड व्हावा याचसाठी केला होता अट्टहास, माझे माहेर पंढरी, सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा, बाजे रे मुरलीया बाजे, अगा वैकुंठीच्या राया, इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची या भक्ती गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली. हर्षद कानिटकर यांनी तबला, संतोष घंटे यांनी हार्मोनियम, सुखद मुंडे यांनी पखवाज तर आनंद टाकळकर यांनी टाळ वाद्यावर साथ करत पंडित जयतीर्थ मेऊंडी यांचे गीत गायन वेगळ्या उंचीवर नेले.

दिवाळी पहाट कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले. आयुक्त शेखर सिंह यांनी शहरवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. नागरिकांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उपआयुक्त विठ्ठल जोशी यांनी केले. समीर सूर्यवंशी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका संगीत कला अकादमी बद्दल प्रास्ताविकाद्वारे माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा पर्यवेक्षक अरुण कडूस, संगीत शिक्षक उमेश पुरोहित, नंदिन सरिन, संतोष साळवे, विनोद सुतार, मिलींद दलाल, वैजयंती सदाफुले, स्मिता देशमुख आदींनी परिश्रम घेतले.