मुंबई, दि. २८ (पीसीबी) : शिवसेनेचे नेते, स्वर्गीय आनंद दिघे यांनी टेंभी नाका येथे जय आंबे देवीची स्थापना केली होती. या ठिकाणी दरवर्षी नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येतो. या ‘जय आंबे’ देवीच्या महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही सहभाग असतो.
एकनाथ शिंदे यांच्या या देवीच्या दर्शनासाठी यंदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे जाणार असल्याची माहिती आहे. ठाण्यातील जय आंबे नवरात्रोत्सवाला गुरुवारी रश्मी ठाकरे या भेट देणार आहेत. त्यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे.
रश्मी ठाकरे या ठाणे आणि मुंबईतील नवरात्रोत्सवाला भेट देणार आहेत. यामुळे ठाकरे-शिंदे गट आमने-सामने येणार असल्याची चर्चा आहे. रश्मी ठाकरे यांच्या नंतर उद्धव ठाकरे टेंभी नाका जय आंबे नवरात्रोत्सवाला भेट देणार का? असाही प्रश्न सध्या विचारला जात आहे.
दरम्यान, नवरात्र महोत्सवातील ‘मराठी दांडिया’चे आयोजन भाजपने केले आहे. त्यावरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाला आहे, आजच्या ‘सामना’मधून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. त्याला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
“कमळाबाईचा आता मराठी दांडिया” असं म्हणत भाजपला शिवसेनेनं डिवचलं आहे. जैन समाजानं मांसाहाराच्या जाहिरातीचा उठवलेल्या मुद्द्याला भाजप जबाबदार असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.
सामनाच्या टिकेवर आशिष शेलारांचे उत्तर दिले आहे. “ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली..ज्यांनी अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले, ज्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले त्यांना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु आहे हे पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत.
“ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय, त्यांना आमचा एकच सल्ला ” मग घ्या ना धौती योग!”अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. शेलारांनी टि्वट केले आहे