रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी आणि बीड पॅटर्न काय आहे ?

0
8

बीड, दि. २7 (पीसीबी) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा घटनाक्रम विधिमंडळात मांडणारे भाजपचे बीडचे आमदार सुरेश धस यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी करत त्यांनी विविध विषयांसंदर्भात अधीक्षकांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ९०० कोटींच्या एका प्रकरणाचा उल्लेख करत ईडी इथे लक्ष देणार का असा सवाल सुरेश धस यांनी केला. अभिनेत्री रश्मिका मंदाना, प्रजक्ता माळी, सपना चौधरी यांची नावे घेत बीड पॅटर्न म्हणजे काय ते समजून घ्यायचे तर इकडे या, असेही आमदार धस म्हणाले.

आकांचे नवेनवे प्रताप आता समोर येत आहेत. अनेक जण आता भेटायला येत आहेत. आकांचे पराक्रम करत आहेत, अशा शब्दांत सुरेश धस यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना नाव न घेता लक्ष्य केलं. कोणाला भविष्यात इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचं असल्यास त्यांनी परळीला यावं. त्यांनी इथून ज्ञान मिळवावं आणि त्याचा प्रचार, प्रसार देशभरात करावा, अशा शब्दांत धस यांनी मुंडेंकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांवर तिरकस भाष्य केलं.

‘रश्मिका मंदाना, सपना चौधरी यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आम्ही ते बघत असतो. इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला करायचं असेल भविष्यात, तर त्यांनी परळीला यावं. तिकडे शिक्षण घ्यावं. ते शिक्षण घेऊन पूर्ण देशात त्याचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळीसुद्धा आमच्याकडे येतात.. हे सगळं काही बघायचं असेल, कोणाला नवा चित्रपट काढायचा असेल. तर या अशा मोठ्या विभूती आहेत, त्यांच्या तारखा कशा मिळतात, त्याचे धडे इथे मिळतात. प्राजक्ता ताईसुद्धा आमच्या इथं येतात. इव्हेंटसाठीही आमचा परळी पॅटर्न आहे,’ अशा शब्दांत धस यांनी आकांवर निशाणा साधला.

पोलीस अधिक्षकांसोबतच्या बैठकीत धस यांनी महादेव ऍपच्या माध्यमातून बीडमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशीची मागणी केली. त्याची माहितीही त्यांनी माध्यमांना दिली. ‘माझ्या मतदारसंघाच्या टोकाला असलेल्या टेंभुर्णी गावात एकाच व्यक्तीच्या नावावर ९ कोटींचा व्यवहार झाला आहे. १०० कोटी रुपयांच्या वरचा घोटाळा असल्यास ईडीची चौकशी लागते. ९ कोटी रुपयांचा व्यवहार एकाच व्यक्तीच्या नावानं झालं असेल तर मग आता कोणत्या यंत्रणांनी हा व्यवहार तपासायला हवा? एका व्यक्तीच्या नावावर ९ अब्ज रुपयांचा व्यवहार आहे. असे आणखी काही जण असतील. महादेव ऍपच्या माध्यमातून बीडमध्ये अब्जावधींचा घोटाळा झालेला आहे. याचा तपास झाला पाहिजे. याची लिंक मलेशियापर्यंत जाते. पोलीस निष्क्रिय राहिल्यानं हा प्रकार झाला’, असा दावा धस यांनी केला.