माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. धंगेकर हे दररोज मंत्री मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळे पुण्यात राजकारण तापलं आहे. यानंतर आज धंगेकरांनी पुन्हा एकदा नवी पोस्ट शेअर करत मोहोळांवर खळबळजनक आरोप केलेत. मंत्री मोहोळांनी गोखले यांच्यासाठी केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर केल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे.
“पुण्यातील जैन बोर्डिंग बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही. केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत यापूर्वी देखील एका प्रकरणात मोठी अनियमित केली असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर प्रकरणात ज्या कंपनीला फायदा करून दिला त्या कंपनीने मुरलीधर मोहोळ यांचा व्यावसायिक भागीदार अशी ओळख असलेल्या विशाल गोखले यांना विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्रायव्हेट जेट देखील उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आले आहे”, असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलं आहे.
“जुहू विमानतळावरून आपले ऑपरेशन्स चालवणाऱ्या बॉम्बे फ्लायिंग क्लबकडून एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाला (AAI) देय (भरणा) असलेल्या रकमेच्या वसुली थकबाकीबाबत लेखापरीक्षण अहवाल आणि अंतर्गत अंदाजांनुसार नमुद केल्याचे आढळून आले आहे. नियमानुसार क्लबकडून व्यावसायिक दरांनुसार शुल्क आकारले गेले असते, तर सुमारे एकूण थकबाकी २०० कोटींची वसुली करणे अपेक्षित होते. परंतु केंद्रीय राज्यमंत्र्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागामुळे हे प्रकरण केवळ २.३० कोटींमध्ये तडजोड करण्यात आलेली असल्याचे दिसून येत आहे”, असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला.
“मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मुंबई फ्लाईंग क्लबवर दाखवलेल्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचे सुमारे १९७ कोटी रुपयांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून ज्या क्लबला याचा फायदा मिळवून दिला त्या मुंबई फ्लाईंग क्लबने विशाल गोखले यांच्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवले होते. यामागे नेमकी कोणत्या प्रकारच्या कामाची दलाली विशाल गोखले मार्फत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे, हा तपासाचा विषय आहे. याबाबत मुरलीधर मोहोळ यांनीच खुलासा करावा”, असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलं आहे.
“मी उपोषण नाही तर धरणे आंदोलन करणार आहे. हे भारतीय जनता पक्ष आणि रवींद्र धंगेकर युद्ध नाही. पण आज अनेक लाभार्थी लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. आता त्यावर मी बोलणार नाही, मी कालच सांगितलं की जोपर्यंत जैन मंदिराची सुटका होत नाही, तसेच या प्रकरणात बिल्डर आणि ज्यांनी बिल्डरांना पाठिशी घातलं, त्यांच्यावर मी बोलणार आहे”, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
“आपण शनिवारी पाहिलं की मुरलीधर मोहोळ त्या ठिकाणी गेले, काय बोलले ते माहिती नाही, पण एक नक्की हे की तेथील लोकांनी त्यांना हाकललं. अनेक महिला भगिनी त्यांच्यावर धावून आल्या. आता त्यांना थोडी लाज असेल तर त्यांनी सोमवारपर्यंत संबंधित बिल्डर्सशी बोलून हा विषय मिटवला पाहिजे. या गतिमान भूखंड व्यवहार प्रकरणात ठरवलं तर एका तासात हा विषय संपवू शकतो”, असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
“माझे आणि मुरलीधर मोहोळ यांचा काही वाद नाही. मात्र, अशा प्रकरणावर बोलावंच लागेल अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. जर हा विषय ते थांबवत नसतील तर मी उद्यापासून धरणे आंदोलन करणार आहे. ही माझी सुरूवात आहे, मी आणखी लढणार आहे. पण जर गेल्या १८ दिवसांत मुरलीधर मोहोळ या विषयावर बोलले असते तर ही वेळ आली असती का? काल जैन बांधवांनी त्यांना हाकलवून दिलं. जैन बांधवांची शांतता ओळखून जर त्यांनी ही जागा घेतली असेल तर जनतेचा उद्रेक होऊ शकतो”, असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलं आहे.














































