रविवारी सकाळी सांगवीच्या शाळेत रोजगार मेळावा

0
282

– ४० हून अधिक खासगी उद्योजकांचा सहभाग

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पुण्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक आणि इतर सेवा क्षेत्रातील खासगी उद्योगांकडून विविध प्रकारची सुमारे साडेसात हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ४ डिसेंबरला सकाळी ९ वाजता नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विभागीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

तरुणांनी नोकरीच्या संधी करीता संपर्क साधण्याचे आवाहन मेळाव्याचे संयोजक चिंचवड विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी केले आहे. या महारोजगार मेळाव्यात पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील ४० हून अधिक खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे साडेसात हजार रिक्तपदे मेळाव्यासाठी कळविली आहेत. या पदांसाठी किमान आठवी, नववी, दहावी, बारावी उत्तीर्णांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी पात्रता असणारे महिला-पुरुष उमेदवार पात्र असतील. या रोजगार मेळाव्यात स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करणारी महामंडळे, दिव्यांग उमेदवारांसाठी विविध योजनांची माहिती, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे स्टॉलही लावणार आहेत. उमेदवारांना एकाच ठिकाणी रोजगार व कौशल्य विकास प्रशिक्षणाची माहिती उपलब्ध होणार आहे,.

इच्छुक उमेदवारांनी http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाइन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज आणि आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.