रविवारी नारीशक्तीच्या भव्य मोर्चाचे आयोजन

0
59

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) :  अल्पवयीन मुली, मुले, युवती, महिलांवर बलात्कार, सामूहिक बलात्कार आणि हत्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवेस वाढत होत आहे. अशा घटनांना पायबंद बसावा आणि यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील महिला व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, संघटना, मंडळ, ट्रस्ट आदींच्या प्रतिनिधींचा भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मोर्चाचे समन्वयक मानव कांबळे यांनी दिली.

शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला प्रतिनिधींसह माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत धर, प्रियांका बारसे तसेच डॉ. मनीषा गरुड, सायली नढे, अनिता तुतारे, सविता इंगळे, अपर्णा दराडे, सुनिता शिंदे, रेखा मोरे, योगिनी मोहन, निशा काळे, किरण नाईकडे, सुप्रिया पोहरे आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्व महिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आणि रविवारी आयोजित केलेल्या भव्य नारीशक्ती मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे असेही आवाहन केले.

यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महिलांवरील अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत राष्ट्रीय गुन्हे सर्वेक्षणचा आढावा घेतल्यास दर तासाला देशामध्ये ५० पेक्षा जास्त अशा घटनांची नोंद होत आहे. मागील वर्षी देशात ४ लाख ४५ हजार पेक्षा जास्त बलात्कारांच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहर तसेच ग्रामीण भागातील महिला भीतीच्या छायेत जगत आहेत. बलात्कार करणाऱ्या नराधमांना कायद्याचा, पोलिसांचा व समाजाचा धाक राहिला नाही. अवघ्या चार वर्षाची चिमूरडी ते ७० वर्षांची वयोवृद्ध महिला या नराधमांची बळी ठरली आहे. आधुनिकतेच्या नावाखाली सुरू असणारा स्वैराचार यास कारणीभूत आहे. संविधानिक अधिकार, स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलता आणि बीभत्सतेला प्रोत्साहन दिले जात आहे. यावर पोलीस, प्रशासनाचे नियंत्रण नाही आणि कायद्याचेही बंधन नाही. काही अंशी अशा घटनांना तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता आणि सोशल मीडिया, बेरोजगारी जबाबदार असल्याचे दिसते. यासाठी सामाजिक प्रबोधन आणि माध्यमिक शालेय स्तरावर मुला, मुलींना लैंगिक शिक्षण सुरू करणे आवश्यक आहे. सर्व क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारी स्त्री शक्ती सध्या भयभीत आणि असुरक्षित असल्याचे दिसते. अत्याचार ग्रस्त पीडित युवती, महिलांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने देशभर “शक्ती कायदा” मंजूर करावा व त्याची कडक अंमलबजावणी करावी याकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांच्या वतीने “नारीशक्ती” मोर्चाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा रविवारी ( दि. १ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता आकुर्डी खंडोबा माळ चौकातून सुरू होणार आहे. आकुर्डी गावठाण, म्हाळसाकांत महाविद्यालय चौक ते निगडी लोकमान्य हॉस्पिटल ते तहसीलदार कार्यालय निगडी ( कै. मधुकर पवळे उड्डाणपूल) येथे मोर्चाचा समारोप होणार आहे. यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात येईल.
या मोर्चात शहरातील सर्व संवेदनशील नागरिकांनी सहभागी होऊन महिलांवर अन्याय, अत्याचार होणाऱ्या घटनांबाबत निषेध व्यक्त करावा असे आवाहन समन्वयक मानव कांबळे यांनी केले आहे